लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर : कोल्हापूर मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू शहाजी छत्रपती यांच्या नावे स्थावर व जंगम अशी मिळून २९७ कोटी ३८ लाख ०८ हजार रुपयांची संपत्ती असल्याचे त्यांनी संपत्ती विवरणपत्रात नमूद केले आहे. त्यांच्या पत्नी याज्ञसेनीराजे छत्रपती यांच्या नावे ४१ कोटी ०६ लाखांची संपत्ती आहे. विशेष म्हणजे त्यांच्यावर कसलेही कर्ज नाही.
शाहू छत्रपतींची १४७ कोटी ६४ लाख ४९ हजार रुपयांची जंगम मालमत्ता, तर १४९ कोटी ७३ लाख ५९ हजारांची स्थावर मालमत्ता आहे. त्यांच्या पत्नी याज्ञसेनीराजे यांच्या नावे अनुक्रमे १७ कोटी ३५ लाख व २३ कोटी ७१ लाखांची जंगम व स्थावर मालमत्ता आहे. शाहूंना दागिन्यांचा शौक नसला तरीही एक कोटी ५६ लाखांचे सोन्याचे, तर ५५ लाखांचे चांदीचे दागिने आहेत.
शाहू छत्रपतींच्या नावावर असलेल्या वाहनांची किंमत सहा कोटी आहे. १२२ कोटी ८८ लाख इतक्या किमतीची शेतजमीन आहे. पत्नी याज्ञसेनी यांच्या नावावर सात कोटी ५२ लाख रुपयांची शेतजमीन आहे.
संजय मंडलिक यांची संपत्ती किती वाढली?कोल्हापूर मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांची एकूण संपत्ती १४ कोटी ३७ लाख २८ हजार ३९८ रुपये इतकी आहे. मंडलिक यांच्या संपत्तीत २०१९च्या तुलनेत तब्बल ५ कोटी ६५ लाख रुपयांनी वाढ झाली. खा. मंडलिक यांनी उमेदवारी अर्जासोबत दिलेल्या प्रतिज्ञापत्रात जंगम मालमत्ता १ कोटी १५ लाख ३२ हजार ५२५ रुपये असल्याचे म्हटले आहे. तसेच १३ कोटी २१ लाख ९५ हजार ८७३ रुपये किमतीची स्थावर मालमत्ता असल्याचे नमूद केले आहे.
राजू शेट्टी : मालमत्तेत ५० लाखांची वाढहातकणंगले मतदारसंघातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार राजू शेट्टी यांच्या मालमत्तेत गेल्या ५ वर्षांत ५० लाखांची वाढ झाली आहे. त्यांना शेतकऱ्यांनी फॉर्च्युनर गाडी भेट दिली आहे. त्यांच्या अंगावर विविध वित्तीय संस्थांची ७८ लाख ५० हजारांची कर्जे असून, पत्नी संगीता शेट्टी यांच्यावर १४ लाख ७५ हजार, तर मुलगा सौरभ यांच्या अंगावर ५६ लाख ८१ हजारांची कर्जे आहेत.
धैर्यशील माने : ३० लाखांनी मालमत्ता कमीहातकणंगले मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार धैर्यशील माने यांची मालमत्ता ४ कोटी ४५ लाख ६१ हजार रुपये इतकी आहे. गत निवडणुकीपेक्षा ती ३० लाखांनी कमी झाली आहे. गतवेळी माने यांची संपत्ती ४ कोटी ७७ लाख ७१ हजार ३६३ इतकी होती. यात यंदा जवळपास ३० लाख रुपयांनी घट झाली आहे. सध्या माने यांच्यावर २ कोटी १९ लाख रुपयांचे कर्ज आहे.
सत्यजीत पाटील यांची मालमत्ता साडेतीन कोटींवर हातकणंगले मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील- सरूडकर यांची स्थावर आणि जंगम अशी एकूण मालमत्ता ३ कोटी ५७ लाख ८३ हजार रुपये असल्याचे त्यांनी दिलेल्या मालमत्ता विवरण पत्रावरून समोर आले आहे. त्यांच्यावर ५ लाख ९३ हजार रुपयांचे कर्ज आहे. त्यांच्याकडे एक इनोव्हा आहे. पत्नी प्राजक्ता यांच्या नावे एक कार आणि मुलगा वीरधवल यांच्याकडे १ लाख ९५ हजार रुपयांची दुचाकी आहे. त्यांच्याकडे रोख १ लाख २५ हजार, तर पत्नीकडे ७५ हजार, मुलाकडे १० हजार रुपये रोख आहेत.