कागल : राजर्षी शाहू महाराजांच्या घराण्याबद्दल आम्हांला आदरच आहे; पण त्यांचे मूळ जनक घराणे कागलमध्ये आहे. म्हणून आमचाही त्यांच्यावर तितकाच अधिकार आहे. उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात ते आले आहेत; तर केवळ राजर्षी शाहू महाराजांचे काम सांगू नये. तुम्ही काय काम केले आहे हे सांगावे. काहींनी आपल्या स्वार्थासाठी शाहू छत्रपतींना आपला डमी उमेदवार म्हणून उभे केले आहे, अशी थेट टीका महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांनी केली.मंडलिक यांच्या प्रचारासाठी कागल गडहिंग्लज विधानसभा मतदार संघातील भाजपा कार्यकर्त्यांचा मेळावा कागल येथे आयोजित केला होता. यावेळी ते बोलत होते. शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजित घाटगे, वीरेंद्र मंडलिक, उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे, राजे बँकेचे अध्यक्ष एम. पी. पाटील, प्रकाश पाटील, राजेंद्र जाधव, संजय पाटील, रमेश माळी, आदी उपस्थित होते.खासदार मंडलिक म्हणाले, राजे गट व मंडलिक गट या पुढेही एकत्र राहील. यावेळी समरजित घाटगे यांचेही भाषण झाले. युवराज पाटील यांनी स्वागत केले. प्रा. सुनील मगदूम, राजेंद्र तारळे यांची भाषणे झाली. बाॅबी माने यांनी आभार मानले. या वेळी प्रताप पाटील, संजय गांधी निराधार योजनेचे सदस्य अरुण गुरव, राजे बँकेचे नंदकुमार माळकर, प्रकाश पाटील, अप्पासाहेब भोसले, पप्पू कुंभार, असिफ मुल्ला, रणजित पाटील, आदी उपस्थित होते.
कागलचे नेते सक्षमसंजय मंडलिक म्हणाले, ‘माझी उमेदवारी शिंदे गटात प्रवेश केला तेव्हाच निश्चित झाली होती; पण तरीही चर्चा सुरू झाल्या. मला नाही तर मग कोण? तर समरजित घाटगे यांचे नाव पुढे आले. राष्ट्रवादीतून हसन मुश्रीफ यांचे, तर ठाकरे गटातून संजयबाबा घाटगे यांच्याही उमेदवारीची चर्चा होत होती. याचाच अर्थ कागल तालुका कोणतेही राजकीय आव्हान पेलू शकतो, असा आहे.’