कोल्हापूर : अयोध्येतील भव्य मंदिरात श्री रामाच्या मूर्तीच्या आनंद सोहळा साजरा होत असताना, कोल्हापुरातील श्री अंबाबाई मंदिरातील श्रीराम मंदिरात छत्रपती देवस्थान ट्रस्टतर्फे शाहू छत्रपतींनी श्रीरामाचे पूजन व महाआरती केली. माजी खासदार संभाजीराजे, माजी आमदार मालोजीराजे यांच्या हस्ते श्रीरामाच्या मूर्तीला अभिषेक झाला. यावेळी याज्ञसेनीराजे, संयोगिताराजे, मधुरिमाराजे, यशराजराजे उपस्थित होते.‘जय श्रीराम’चा जयघोष आणि शाहू वैदिक विद्यालयाच्या पुरोहितांनी केलेल्या मंत्रघोषात पूजाविधी झाले. यावेळी शाहू छत्रपती म्हणाले, छत्रपती शहाजीराजे आणि जिजाऊंनी दिलेल्या संस्काराला अनुसरून शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्मिती केले. त्यांच्या मुलाचे नाव ‘राजाराम’ होते. कोल्हापूर संस्थान छत्रपती ताराराणी यांच्या पतीचेही नाव राजाराम होते. श्रीरामभक्ती छत्रपती घराण्यात परंपरागत आहे. श्रीराममूर्ती प्रतिष्ठापनेचा आनंद सोहळा देशातील जनता साजरा करत आहे, छत्रपती घराणेही सहभागी आहे.युवराज संभाजीराजे म्हणाले, राम वनवासातून अयोध्येत परत आले, त्या दिवसाप्रमाणे अयोध्येत आज मूर्तीरूपात श्रीराम प्रतिष्ठापना होत आहे, हा आनंद मोठा आहे. कारसेवकांपासून ते मंदिर घडविणाऱ्या कारागीरांचे भक्तांच्या वतीने विशेष आभार मानतो.पुरोहित बाळू दादर्णे, अमर जुगर, संदीप दादर्णे यांनी पौरोहित्य केले. सकाळपासूनच श्री शाहू संगीत विद्यालयाचे अरुण जेरे गुरुजी आणि सहकाऱ्यांनी गीत रामायण व श्रीराम गीत गायनाने मंदिरातील वातावरण भक्तिमय केले. महालक्ष्मी भक्त मंडळातर्फे भाविकांना प्रसाद वाटप झाले. यावेळी राजू मेवेकरी व सहकारी उपस्थित होते. त्यानंतर, श्रीरामाच्या दर्शनासाठी मंदिरात भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
शाहू छत्रपतींनी केले श्रीरामाचे पूजन, कोल्हापुरातील अंबाबाई मंदिरातील राम मंदिरात सोहळा
By इंदुमती सूर्यवंशी | Published: January 22, 2024 7:28 PM