कोल्हापूर : कोरोना संक्रमणापासून बंद असलेल्या राजर्षी शाहू कुस्ती मैदानात सात जानेवारीला पुन्हा एकदा नव्या जोशात शड्डूचा आवाज घुमणार आहे. शाहू छत्रपती यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्ताने कुस्ती मैदान भरविण्यात येत आहे. त्याची पूर्वतयारी म्हणून शुक्रवारी सकाळी प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांच्या समवेत खासबाग कुस्ती मैदानाची पाहणी केली.ऐतिहासिक कुस्ती मैदानात अनेक नामवंत मल्लांच्या कुस्त्या झाल्या आहेत. आपली एक तरी कुस्ती या मैदानात व्हावी, अशी इच्छा देशभरातील नामवंत मल्लांची असते. अनेक मल्लांनी या मातीत आपली कुस्तीकला दाखवली. परंतु अलीकडे कुस्तीची मैदाने कमी होत आहेत, त्यामुळे मल्लांमधील उत्साहही कमी व्हायला लागला आहे.परंतु ज्या राजर्षी शाहू महाराजांनी कुस्तीला राजाश्रय मिळवून दिला, त्यांच्याच घराण्याच्या वारसदार शाहू छत्रपती यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधून कुस्तीला पाठबळ देण्यासाठी सात जानेवारी रोजी मैदान आयोजित केले आहे. कुस्तीचे आश्रयदाते शरद पवार हे देखील यावेळी उपस्थित राहणार आहेत.मैदानाच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने मालोजीराजे, कादंबरी बलकवडे यांनी मैदानाला भेट देऊन मैदानावरील प्रेक्षक गॅलरीतील गवत काढणे, लाईट व्यवस्था, झाडे कटिंग, मैदानात लाल माती टाकणे, स्टेजची डागडुजी, बोर्डची रंगरंगोटी व दगडी भिंतीला पडलेल्या भेगा बुजविण्याबाबत चर्चा करण्यात आली. प्रशासक बलकवडे यांनी कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. त्यानुसार मैदानावरील गवत कटिंग, झाडे, झुडपे कटिंग व लाईटची कामे सुरू करण्यात आली आहेत.यावेळी उपायुक्त रविकांत आडसूळ, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, उपशहर अभियंता नारायण भोसले, मुख्य लेखापाल संजय सरनाईक, माजी महापौर महादेवराव आडगुळे, माजी उपमहापौर अर्जुन माने, माजी स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख, सचिन पाटील, मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पवार, इस्टेट ऑफिसर सचिन जाधव, विद्युत अभियंता अमित दळवी, उदय फाळके, आशपाक आजरेकर उपस्थित होते.
ऐतिहासिक खासबाग मैदानात पुन्हा घुमणार शड्डू, शाहू छत्रपतींच्या वाढदिवसानिमित्त कुस्ती मैदान भरणार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2022 12:25 PM