कोल्हापूर: कोल्हापूर लोकसभा मतदार संघातून महाविकास आघाडीतील काँग्रेसकडून शाहू छत्रपती यांची उमेदवारी अपेक्षेप्रमाणे गुरुवारी रात्री जाहीर झाली. या मतदार संघातून काँग्रेस तब्बल २५ वर्षानंतर हात चिन्ह घेवून निवडणूकीला सामोरे जात आहे. महायुतीचा उमेदवार कोण याचा घोळ सुरु असताना काँग्रेसने महाराष्ट्राच्या पहिल्याच यादीत शाहू छत्रपती यांच्या नावाची घोषणा करून त्यांच्या उमेदवारीचा सन्मान केला. पक्षाकडून त्याची घोषणा होताच महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करून आनंद साजरा केला.
मावळत्या सभागृहात ही जागा शिवसेनेने जिंकली होती त्यामुळे ही जागा आघाडीत कोणत्या पक्षाला जाणार आणि कोण निवडणूक लढवणार असे दोन प्रश्र्न होते. सुरुवातीला त्यासाठी तिन्ही पक्षांत रस्सीखेच झाली. उमेदवार म्हणूनही संभाजीराजे, व्ही. बी. पाटील, संजय घाटगे, विजय देवणे, चेतन नरके, बाजीराव खाडे यांची नांवे चर्चेत आली. परंतू काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतेज पाटील यांनी शाहू छत्रपती यांचे नांव पुढे आणल्यानंतर अन्य इच्छुकांची नांवे व पक्षांतील रस्सीखेचही आपोआप कमी झाली. काँग्रेसचे बाळासाहेब थोरात, नाना पटोले, आघाडीचे नेते शरद पवार यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याशी चर्चा करून ही जागा काँग्रेसकडे घेतल्यावर उमेदवाराच्या नावाची औपचारिक घोषणा होण्याचेच तेवढे राहिले होते.
कोल्हापूरच्या सामाजिक जीवनाशी एकरुप झालेले शाहू छत्रपती राजर्षि शाहू महाराज यांच्याच विचारांचा वारसा पुढे चालवत आहेत. त्यांची वैचारिक भूमिका स्पष्ट आहे. त्यांना उमेदवारी मिळण्यामागे ते महत्वाचे कारण आहे. छत्रपती घराण्याचे वारस म्हणून ते कधीच राजेशाही थाटात वावरले नाहीत. सर्वसामान्य जनतेशी त्यांची नाळ कायमच जोडली गेली आहे. उच्चशिक्षित, कोल्हापूरच्या प्रश्र्नांची जाण असणारे नेतृत्व, सर्वमान्य नेतृत्व म्हणून व्यक्तिमत्वाबध्दल असलेला आदर या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत.
देशाच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणात एक स्थितंतर आले आणि १९९९ ला काँग्रेस दुभंगली. त्यावेळी झालेल्या लढतीत काँग्रेसकडून माजी खासदार उदयसिंहराव गायकवाड या मतदार संघातून काँग्रेसच्या चिन्हावर लढले होते. परंतू त्यानंतर हा मतदारसंघ आघाडीत राष्ट्रवादीकडे गेल्यानंतर त्याच पक्षाचा उमेदवार गेल्या चार निवडणूकांमध्ये रिंगणात होता. त्यामुळे हात चिन्ह गोठल्यासारखे झाले होते. आता काँग्रेसप्रेमी जनतेला या चिन्हांवर मतदान करण्याची संधी पुन्हा निर्माण झाली आहे.
जनेतेनेच आग्रह केल्यामुळे मी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. आपली उमेदवारी म्हणजे कोल्हापूरच्या जनतेच्या स्वाभिमानाची लढाई असेल. त्यामुळे ती जिंकण्यासाठी सामान्य जनतेचाच पुढाकार असेल. महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांचे, कार्यकर्त्यांचे मनापासून आभार. त्यांचे सहकार्य, पाठबळ यापुढील वाटचालीत मोलाचे आहे.- शाहू छत्रपती
छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशावळीचे वारसदार..
शाहू छत्रपती हे महाराष्ट्राचे दैवत, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वंशावळीचे थेट वारसदार. भूतपूर्व कोल्हापूर संस्थानचे भाग्यविधाते राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे पणतू आणि मेजर जनरल छत्रपती शहाजी महाराज यांचे पुत्र आहेत.
बंगळूरच्या बिशप स्कूलमध्ये शिक्षण
शाहू छत्रपती यांचा जन्म ७ जानेवारी १९४८ रोजी मुंबईत झाला. त्यांचे शिक्षण बंगळूर येथील बिशप कॉटन स्कूलमध्ये झाले, तर १९६७ मध्ये इंदोरच्या ख्रिश्चन कॉलेजमधून त्यांनी इतिहास, अर्थशास्त्र व इंग्रजी अशा तीन विषयांतील पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. शाहू छत्रपती यांना वाचनाचा छंद आहे. एक भव्य असे ग्रंथालयही त्यांच्याकडे आहे.