‘लोकमत’चे संपादक वसंत भोसले यांनी ‘जागर’ सदरातून कोल्हापूरचे पर्यटन आणि ऐतिहासिक ठेवा यावर भाष्य केल्यानंतर ही बाब ठळकपणे समोर आली आहे. शिवाजी विद्यापीठाच्या शाहू संशोधन केंद्राच्यावतीने शाहू महाराजांवरील प्रबंध प्रकाशित करण्यात येत असत. तत्कालीन कुलगुरू डॉ. के. बी. पोवार आणि संशोधन केंद्राचे संचालक डॉ. विलास संगवे यांच्या संकल्पनेतून या ठिकाणी शाहूकालीन लोकजीवन या विषयाला वाहिलेले संग्रहालय उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी माजी कुलगुरू रा. कृ. कणबरकर यांचे सहकार्य होते. विद्यापीठ अनुदान आयोगाकडे सन १९८७ च्या दरम्यान तसा प्रस्ताव पाठविण्यात आला. संग्रहालयासाठी अभिरक्षक म्हणून दि. १ नोव्हेंबर १९८८ रोजी प्रा. टी. एस. पाटील यांची नेमणूक करण्यात आली. शाहूकार्याविषयी त्यांची आस्था पाहून त्यांना ही जबाबदारी देण्यात आली. त्यांनीही न्यू काॅलेजमधील नोकरी सोडून ही जबाबदारी स्वीकारली आणि चार वर्षे झपाटून काम केले. जिल्ह्यातील बाराही तालुक्यांतील फिरती केली. कृषिकालीन औजारे, कपडे, दागिने, वस्तू, शस्त्रास्त्रे, भांडी, चामड्याच्या वस्तू अशा अडीचशेहून अधिक वस्तू गोळा केल्या. तत्कालीन वापरातील दागिने मिळवून हुबेहूब, तसेच चांदीचे दागिने सुरेश चराटे यांनी करून दिले. सातपुते यांनी चामड्याच्या अनेक वस्तू उपलब्ध करून दिल्या. बाबासाहेब मिरजकर यांनी तत्कालीन वापरातील वाद्ये दिली. परशुराम जाधव, माजी आमदार रवींद्र सबनीस, ऊर्मिला सबनीस, पोकळे अशा अनेकांनी शाहू महाराजांच्या आदरापोटी हे साहित्य उपलब्ध करून दिले. अनेक छायाचित्रे संकलित करण्यात आली. तत्कालीन रायल फोटो स्टुडिओमध्ये पाणी शिरल्यानंतर तेथील जुन्या फोटोंचा गठ्ठा मिळविण्यात आला. सन १९९१ पर्यंत प्रा. पाटील यांनी हे काम निष्ठेने केले. मात्र, राज्य शासनाकडून त्यांच्या पदाची मंजुरीच मिळेना. विद्यापीठानेही प्रयत्न केले. परंतु, मुंबईत मंत्रालयात त्यावेळी कोणाची डाळ शिजली नाही. अखेर जेव्हा नोकरीचा प्रश्न निर्माण झाला तेव्हा पाटील यांनी हे पद सोडले आणि ते रयत शिक्षण संस्थेत प्रोफेसर झाले.
चौकट
अजूनही पदांना मंजुरी नाहीच
प्रा. पाटील आता सेवानिवृत्तही झाले. मात्र, अजूनही या संग्रहालयासाठीच्या पदांना मान्यता मिळालेली नाही. पदालाच मान्यता नसल्याने काम करणार कोण आणि कसे असा प्रश्न आहे. या दरम्यानच्या काळात संकलित केलेले साहित्य शाहू संशोधन केंद्रात ठेवण्यात आले आहे. मात्र, कितीही जपून ठेवले तरी ३२ वर्षांच्या काळाचा परिणाम या वस्तूंवर झालेलाच असणार यात शंका नाही.
कोट
अतिशय उत्साहाने आणि परिश्रमपूर्वक मी शाहूकालीन लोकजीवनाबाबतच्या २५० हून अधिक वस्तूंचे संकलन केले होते. परंतु, जेव्हा माझ्या नोकरीचा प्रश्न निर्माण झाला तेव्हा मला मनात नसतानाही हे काम थांबवावे लागले. आता तरी किमान लवकरात लवकर हे संग्रहालय उभारले तर माझे परिश्रम सार्थकी लागतील.
प्रा. टी. एस. पाटील, माजी अभिरक्षक
फोटो (२४०२२०२१-कोल-शिवाजी विद्यापीठ म्युझियम ०१, ०२) : शिवाजी विद्यापीठातील शाहूकालीन लोकजीवन संग्रहालयासाठी कृषिकालीन औजारे, कपडे, दागिने, वस्तू, शस्त्रास्त्रे, भांडी, चामड्याच्या वस्तू अशा अडीचशेहून अधिक वस्तू संकलित केल्या आहेत.