लोकमत न्यूज नेटवर्क
काेल्हापूर : ‘गोकुळ’च्या निवडणुकीसाठी मंगळवारी विरोधी राजर्षी शाहू आघाडीच्या नेत्यांची बैठक झाली. यामध्ये पॅनेलमधील बहुतांश नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आले असून सोमवारी (दि. १९) पॅनलची अधिकृत घोषणा केली जाणार आहे. दोन-तीन जागांवर खल करण्यासाठी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, आमदार राजेश पाटील, आमदार विनय काेरे, चंद्रदीप नरके, के. पी. पाटील, ए. वाय. पाटील, संपतराव पवार, आदी उपस्थित होते.
‘गोकुळ’च्या पॅनल बांधणीस वेग आला आहे. दोन्ही आघाड्यांकडून अंतर्गत हालचाली सुरू आहेत. पॅनलमधून नाकारल्यानंतर कोण विरोधकांच्या हाताला लागतील, याची चाचपणी दोन्ही गटांकडून सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर विरोधी शाहू आघाडीकडून प्रमुख नेत्यांची बैठक घेतली. यामध्ये ‘गोकुळ’ची निवडणूक, कोरोनाचे संकट आणि त्या पार्श्वभूमीवर करण्यात येणारे लॉकडाऊन यांबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. लॉकडाऊन सुरू झाले तर मतदारांच्या गाठीभेटी कशा घ्यायच्या, उमेदवारी अर्ज दाखल केलेल्यांची माघारीची प्रक्रिया कशी राबवायची? यावरही बैठकीत चर्चा होऊन नियोजन करण्यात आले.
‘परिवर्तन’मधून लढलेल्यांची समजूत कशी काढायची
‘गोकुळ’च्या मागील निवडणुकीत पालकमंत्री सतेज पाटील यांच्या परिवर्तन आघाडीच्या वतीने लढलेल्यांची समजूत कशी काढायची? यावर बैठकीत चर्चा झाली.
‘शेकाप’ नाराज, आज बैठक
शेतकरी कामगार पक्षाने विरोधी आघाडीकडे एका जागेची मागणी केली आहे. मात्र त्यांच्याकडील ठरावांची संख्या पाहता, नेत्यांकडून जागेबाबत फारसा प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे ‘शेकाप’चे पदाधिकारी नाराज असून आज, बुधवारी प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन पुढील दिशा ठरविली जाण्याची शक्यता आहे.
सत्तारूढ गट विजयसिंह मोरे यांच्या संपर्कात
विरोधी आघाडीकडून उमेदवारीबाबत ठाम सांगितले जात नसल्याने विजयसिंह मोरे अस्वस्थ आहेत. या पार्श्वभूमीवर मंगळवारी रात्री सत्तारूढ गटाच्या काही नेत्यांनी मोरे यांची घरी जाऊन भेट घेतल्याचे समजते.