कोल्हापूर : पांजरपोळ प्रभागाचे नगरसेवक वसंत कोगेकर यांनी आपल्या विकासकामांचा जोरदार धडाका लावला आहे. मात्र, प्रभागातील शाहू महाराजांच्या पुतळ््याच्या सुशोभीकरणासह प्रभागातील औद्योगिक वसाहतीकडे त्यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. पांजरपोळ प्रभाग कष्टकरी नागरिकांच्या वसाहतीसह औद्योगिक वसाहत असलेला प्रभाग होय. या प्रभागात वसंत कोगेकर यांनी आपल्या कार्यकर्त्यांमार्फत विकासकामांचा डोंगर रचला आहे. प्रभागातील प्रत्येक गल्लीमध्ये एका पदाधिकाऱ्याची नेमणूक केली आहे. त्यांच्यामार्फत येथील समस्या सोडविण्याचा धडाका त्यांनी लावला आहे. राजारामपुरी भाजी मार्केट ते पांजरपोळपर्यंत रस्त्यांचे कित्येक वर्षांपासून काम न झाल्याने जागोजागी खड्डे पडले होते. यामुळे येथील नागरिकांची या ठिकाणाहून प्रवास करताना चांगलीच तारांबळ होत होती. हा रस्ता व्हावा, अशी अनेक वर्षांपासून येथील नागरिकांची मागणी होती. हा रस्ता तयार प्रभागात मोठ्या प्रमाणात झोपडपट्टी आहे. यामुळे या ठिकाणी गटारीचे नियोजन नसल्याने सांडपाण्याचा प्रश्न खूप बिकट होता. गटारीचे नियोजन नसल्याने सांडपाणी रस्त्यांवरच वाहात होते. त्यामुळे नगरसेवकांनी या ठिकाणी अंतर्गत गटारीचे नियोजन करून येथील सांडपाण्याचा प्रश्न मार्गी लावला आहे. यासह प्रभागातील प्रत्येक गल्लीत औषध फवारणी व कचरा उठाव होत असल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे. प्रभागातील शाहूनगर भागातील पाण्याची समस्या सोडविण्यासाठी नवीन पाईपलाईन टाकण्यात आल्याने येथील पाण्याचा प्रश्न सुटला आहे. मात्र, शाहू मिल कॉलनी येथे पूर्वी दोन वेळेला पाणी येत होते. आता फक्त एकदाच पाणी येत असल्याने येथील नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. याच ठिकाणी असलेल्या पाण्याच्या टाकीची अत्यंत दुरवस्था झाली आहे. टाकीचे सिमेंट ढपळे नेहमी पडत असतात. मोठी दुर्घटना होण्याआधी ही पाण्याची टाकी येथून हटवावी, अशी मागणी कित्येक वर्षांपासून येथील नागरिक करत आहेत. मात्र, याची दखल कोणी घेत नसल्याने नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. प्रभागात शाहूनगर ही मोठी वसाहत आहे. या ठिकाणी शाहू महाराजांचा अर्धपुतळा आहे. शाहू महाराजांच्या पुतळ्यास दररोज पुष्पहारही अर्पण केला जातो. मात्र, या पुतळ््याच्या सभोवतीच्या कंपाऊंडची मोठी दुरवस्था झाली आहे. नागरिक येथे कपडे वाळत घालतात. तसेच आतील बागेची मोठी दुरवस्था झाल्याने बागेचे विद्रुपीकरण झाले आहे. नगरसेवकांच्या बंगल्यासमोरच हा पुतळा असून नगरसेवक याकडे दुर्लक्ष करत असल्याने नागरिकांमधून तीव्र नाराजी आहे. पांजरपोळ औद्योगिक वसाहतीमध्ये कोणतीच सुविधा महानगरपालिकेने पुरविली नाही. अंतर्गत रस्ते नाहीत की पिण्याच्या पाण्याची सोय नाही. मुतारीची सोय नसल्याने येथील कामगारवर्गांची गैरसोय होत आहे. आमचे प्रभागात मतदान नसल्याने नगरसेवक दुर्लक्ष करत असल्याची ओरड येथील नागरिक करतात. प्रभागातील काही भागातील कित्येक वर्षे प्रलंबित असलेले प्रश्न मार्गी लावण्यात नगरसेवक यशस्वी झाले आहेत. मात्र, अजून काही प्रश्न प्रलंबित आहेत.
पांजरपोळ प्रभागात ‘शाहूं’ची उपेक्षा
By admin | Published: February 09, 2015 11:18 PM