चिकोडी (बेळगाव) : बेळगाव, धारवाड ते हरिहरपर्यंत पेशव्यांनी व शाहू महाराजांनी कन्नड शाळा बंद करून मराठी शाळा सुरू केल्या होत्या, असे वादग्रस्त वक्तव्य केएलई संस्थेचे कार्याध्यक्ष, माजी राज्यसभा सदस्य डॉ. प्रभाकर कोरे यांनी केले. बेळगाव जिल्ह्यातील रायबाग तालुक्यातील यड्राव गावात गुरुवारी केएलई संस्थेच्या कन्नड शाळेच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमास कर्नाटक राज्याचे प्राथमिक शिक्षण मंत्री नागेश देखील उपस्थित होते.ते म्हणाले, केएलई संस्था नसती तर आज बेळगाव कर्नाटकात राहिले नसते. केएलईने सीमाभागात अनेक कन्नड शाळा सुरू करून बेळगाव व सीमाभागात कन्नड वाढविण्याचे काम केले आहे. यावेळी त्यांनी हा भाग मुंबई प्रांतात असल्याने त्या काळी शाहू महाराजांनी व पेशव्यांनी बेळगावसह हरिहरपर्यंतच्या भागात कन्नड शाळा बंद करून मराठी शाळा सुरू केल्या होत्या. त्यामुळे रायबाग भागातदेखील प्रत्येक गावात मराठी शाळा होत्या.सीमाभागात कन्नड शाळा वाढविण्याची गरज आहे. कन्नड वाढविण्यासाठी सरकारने खासगी शाळांना दोन वर्षांनंतर सरकारी अनुदान सुरू करावे, असे सांगितले.
पेशव्यांसह शाहू महाराजांनी कन्नड शाळा बंद करून मराठी शाळा सुरू केल्या, प्रभाकर कोरेंचे वादग्रस्त वक्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2022 3:48 PM