भारत चव्हाणअंतरवाली सराटी : कोल्हापूरच्या शाहू छत्रपतींचा हात माझ्या डोक्यावर पडल्यामुळे आता मी कोणालाही घाबरणार नाही. तुमच्या पाठिंब्यामुळे मला दहा हत्तींचे बळ आले आहे, अशा शब्दांत मराठा समाजाच्या आरक्षणासाठी अंतरवाली सराटी येथे उपोषणास बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी शाहू छत्रपती यांचे आभार व्यक्त केले.महाराष्ट्रातील मराठा समाजाला आरक्षण घेतल्याशिवाय आता गप्प बसणार नाही. समाजाला न्याय दिल्याशिवाय थांबणार नाही. महाराष्ट्राला शब्द आहे. राज्य सरकारला पुन्हा एकदा सांगतो की, विशेष अधिवेशन बोलावून मराठा समाजाला ओबीसीचा दर्जा देऊन आरक्षण द्या. सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या. अर्धवट आरक्षण देऊन समाजात दुही माजवू नका, तुम्ही भेद निर्माण केला आहे. निजामकालीन कागदपत्रे तपासून आरक्षण द्या, असे आवाहन जरांगे पाटील यांनी सरकारला केले.यावेळी बोलताना शाहू छत्रपती म्हणाले की, जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत. ते आता आरक्षण घेतल्याशिवाय थांबणार नाहीत. म्हणूनच मराठा समाजाने त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले पाहिजे. जरांगे समाजासाठी लढत आहेत. समाजात एकता असते तेव्हा त्यात ताकद असते. म्हणून सर्वांनी एकत्र लढले पाहिजे. त्यांना पाठिंबा देत असताना आंदोलन शांततेत करावे. कोणीही आत्महत्या करू नये. तरुणांनी आत्महत्या केल्या तर त्यांनी लढायचे तरी कोणासाठी?शाहू छत्रपती यांनी जरांगे पाटील यांना उपोषणादरम्यान पाणी प्यावे, अशी विनंती केली. त्यांच्या विनंतीला मान देऊन जरांगे पाटील यांनी पाणी प्राशन केले. यावेळी घोषणाबाजी झाली. जरांगे पाटील तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है, आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कोणाच्या बापाचे, अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील, अखिल भारतीय मराठा महासंघाचे उपाध्यक्ष वसंतराव मुळीक, बाबा पार्टे, बाबा इंदूलकर, माणिक मंडलिक, चंद्रकांत पाटील, दिलीप देसाई उपस्थित होते.
शाहू महाराजांचा डोक्यावर हात, आले १० हत्तीचे बळ - जरांगे-पाटील
By भारत चव्हाण | Published: November 01, 2023 11:58 AM