कोल्हापूर : शाहूकालीन अभिजन वृत्तपत्रातून बहुजन वर्गाला न्याय मिळत नव्हता. त्यांच्यावरील अन्यायाला वाचा फुटत नव्हती. त्यामुळे ब्राह्मणेतर चळवळीचे महत्त्वाचे अस्त्र असलेल्या बहुजन पत्रकारिता आणि वृत्तपत्रांना राजर्षी शाहू महाराजांनी बळ दिले, असे प्रतिपादन डॉ. अलोक जत्राटकर यांनी सोमवारी केले.शाहू स्मारक भवनच्या मिनी हॉलमध्ये राजर्षि शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टच्यावतीने शाहू महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित व्याख्यानात ते बोलत होते.अध्यक्षस्थानी ज्येष्ठ इतिहास संशोधक प्रा. डॉ. जयसिंगराव पवार होते. व्यासपीठावर डॉ. अशोक चौसाळकर उपस्थित होते.जत्राटकर म्हणाले, वेदोक्त प्रकरणामुळे शाहू महाराजांना अभिजन वर्गाकडून मिळणाऱ्या अन्यायी वागणुकीची झळ बसली होती. त्यामुळे बहुजनांवरील अन्यायाला वाचा फोडणारे आणि त्यांना शहाणं करणारे वृत्तपत्रे निघावीत अशी त्यांची इच्छा होती. दिनमित्र, विजयी मराठा, शिवछत्रपती, तरुण मराठा अशा अनेक बहुजन वृत्तपत्रांना त्यांनी अर्थसाहाय्य केले. किंबहुना महाराजांच्या पाठबळामुळेच या वृत्तपत्रांनी तग धरला.’डॉ. जयसिंगराव पवार म्हणाले, ‘शाहू महाराजांच्या अनेक पैलूंपैकी प्रकाशझोतात न आलेला प्रयोग म्हणजे पत्रकारिता. बहुजनांच्या जागृतीसाठी वृत्तपत्राचा आधार घ्यावा ही जाणीव शाहू महाराजांना वेदोक्त प्रकरणापासून झाली. पत्रकारिता या चळवळीचे सामर्थ्य शाहू महाराजांनी जाणले होते. त्यामुळे त्यांनी अनेक नियतकालिके, वृत्तपत्रांना मदत केली. त्यावेळची पत्रकारिता ही विशेषता बहुजनांची पत्रकारिता ही ध्येयनिष्ठ आणि तत्त्वनिष्ठ दारिद्र्य आणि गांजलेल्या उपेक्षित समाजासाठीच्या चळवळीचे माध्यम होते.डॉ. अशोक चौसाळकर यांनी प्रास्ताविक केले.