कोल्हापूर : तावडे हॉटेल चौकातील कमानीवर झळकणारा जाहिरातीचा फलक उतरवून त्याठिकाणी शिवसेनेच्यावतीने राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या नावाचा फलक शुक्रवारी लावण्यात आला.
दोन दिवसांपासून शहराच्या प्रवेशद्वारावर एका जाहिरातीचा फलक झळकत होता. याबाबत शहरवासीयांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. शुक्रवारी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली शहर शिवसेनेच्यावतीने कोल्हापूरच्या प्रवेशद्वाराचे ‘राजर्षी छत्रपती शाहू महाराज’ असे नामकरण करीत नावाचा फलक लावण्यात आला. यावेळी “जय भवानी जय शिवाजी”, “राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या” विजयाच्या घोषणा देण्यात आल्या.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे कोल्हापूरचा अभिमान आहेत. त्यांच्या विचाराने आजपर्यंत आम्ही शिवसैनिक काम करत आलो आहोत. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी आपला स्वाभिमान अखंड जगाला दाखविला असताना, कोणी उद्योगपती कोल्हापूरच्या स्वाभिमानाला डिवचून प्रवेशद्वारावरच जाहिरातीचा फलक लावत असेल, तर शिवसेना कदापि खपवून घेणार नाही, असा इशारा क्षीरसागर यांनी दिला
यावेळी माजी आमदार सुजित मिणचेकर, शहरप्रमुख रविकिरण इंगवले, माजी नगरसेवक नंदकुमार मोरे, उपशहरप्रमुख जयवंत हारुगले, तुकाराम साळोखे, दीपक चव्हाण, रघुनाथ टिपुगडे, रणजित जाधव, राजू पाटील, सुनील खोत, पानपट्टी सेनेचे अरुण सावंत, किशोर घाटगे, धनाजी दळवी, अश्विन शेळके, नीलेश हंकारे, रियाज बागवान, राजू काझी आदी शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.
फोटो क्रमांक - २५०६२०२१-कोल-शिवसेना
ओळ - कोल्हापूरच्या प्रवेशद्वारावर असलेल्या कमानीवर शुक्रवारी शिवसेनेच्यावतीने राजर्षी शाहू महाराज यांच्या नावाचा फलक लावण्यात आला.