कोल्हापूर : अॅमस्टरडॅम, नेदरलँड्स येथे झालेल्या इंटरशूट आंतरराष्ट्रीय शुटिंग (नेमबाजी) अजिंक्यपद स्पर्धेत कोल्हापूरचा नेमबाजपटू शाहू तुषार माने याने ज्युनिअर गटामध्ये भारतीय ज्युनिअर संघाचे प्रतिनिधित्व करताना वैयक्तिक दोन सुवर्ण आणि एका रौप्यपदकाची कमाई केली. गुरुवार (दि. ६) ते शनिवार (दि. ८) दरम्यान स्पर्धा झाली.या स्पर्धेतील पात्रता फेरीमध्ये ६३० : १ गुणांसह तो प्रथम स्थानावर होता. शनिवारी झालेल्या अंतिम फेरीमध्ये अत्यंत चुरस होऊन शेवटच्या शॉटवर १० : ८ गुणांचे लक्ष्य साधत त्याने भारताच्या संस्कार हवेलिया याला ० : ०१ गुणांनी मागे टाकत सुवर्णपदकाची कमाई केली. संस्कार हवेलिया याला रौप्य, तर नॉर्वेच्या डी वॉस्स मार्टिन याला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.
शाहू याने गुरुवारी सुवर्णपदक, शुक्रवारी रौप्यपदक मिळविले. तो सध्या १२वी विज्ञान शाखेमध्ये छत्रपती शाहू विद्यालय येथे शिक्षण आहे. तो दुधाळी येथील छत्रपती संभाजीराजे शुटिंग रेंजवर सराव करतो. त्याला अर्जुन पुरस्कार विजेत्या आॅलिम्पिकपटू सुमा शिरूर यांचे मार्गदर्शन लाभले, अशी माहिती तुषार माने यांनी रविवारी दिली.