विश्वास पाटीलकोल्हापूर : अजून लग्नाचा पत्ता नाही, तोपर्यंत पाहुण्यांनी बारशाची तयारी सुरू केली असल्याचा अनुभव राज्य शासन येथील शाहू मिलच्या जागेवर करणार असलेल्या शाहू स्मारकाबाबत येत आहे. कारण शाहू मिलच्या जागेची मालकी आजही महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महामंडळाकडे आहे व ती जागा ताब्यात घेण्यासाठी साधे एका ओळीचेही पत्र शासनाकडून वस्त्रोद्योग महामंडळाकडे पाठवण्यात आलेले नाही.मंगळवारी झालेल्या जिल्हा नियोजनच्या आढावा बैठकीत पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सहा महिन्यांत शाहू मिलच्या जागेवर स्मारक उभारण्यासाठी कामाला लागा, असे आदेश दिले आहेत. म्हणून त्यातील वस्तुस्थिती ‘लोकमत’ने जाणून घेतली. तोट्यात गेल्याने ३१ ऑगस्ट २००३ ला शाहू मिलचा अखेरचा भोंगा बंद झाला आहे.वस्त्रोद्योग महामंडळ हे राज्य शासनाचेच अंग असल्याने हस्तांतर काय अवघड आहे, असा अविर्भाव आतापर्यंत चार सरकारने दाखवला आहे. विधानसभेच्या २०१४ च्या निवडणुकीच्या अगोदर काही दिवस तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी येथे स्मारकाची घोषणा केली. त्यांनी घाईगडबडीत येऊन त्याचा कोनशिला समारंभही उरकून घेतला. परंतू त्यानंतर राज्यात सत्तांतर झाले. भाजप-शिवसेनेच्या सरकारमध्ये चंद्रकांत पाटील हे पालकमंत्री झाले. परंतू पाच वर्षांत त्यांनी या स्मारकाकडे ढुंकूनही पाहिले नाही. त्यानंतर महाविकास आघाडीचे सरकारमध्ये पालकमंत्री सतेज पाटील यांनी शाहू महाराजांच्या स्मृतिशताब्दीचे सर्व कार्यक्रम मिलच्या आवारात घेऊन मिल जिवंत केली. परंतू त्यांच्याही काळात जागा हस्तांतरित करण्यासाठी हालचाली झालेल्या नाहीत. त्यानंतर आता नव्याने हा विषय पालकमंत्री केसरकर यांनी उपस्थित केला आहे.
शाहू स्मारकाचे आराखडे तयार केले आहेत, त्यासाठी लाखो रुपये खर्च झाले आहेत, परंतू मूळ जागाच अजून शासनाकडे हस्तांतरित झालेली नाही. या जागा स्मारकासाठी हस्तांतरित करण्यात यावी, असा प्रस्ताव नगरविकास व वस्त्रोद्योग मंत्रालयाने राज्य वस्त्रोद्योग महामंडळाकडे पाठवण्याची गरज आहे. त्यानंतरच हस्तांतराची प्रक्रिया सुरू होईल.
दृष्टिक्षेपात शाहू मिल
- राजर्षी शाहू महाराजांनी १९०६ मध्ये दि शाहू छत्रपती स्पिनिंग ॲन्ड विव्हिंग मिल्सची पायाभरणी केली.
- शाहूंनी त्यासाठी तळ्याजवळीच जागा व ५० हजार रुपयांचे भांडवल उपलब्ध करून दिले
- मिलचा शेवटचा भोंगा वाजला ३१ ऑगस्ट २००३
- मूळ जागा : २६.७५ एकर
- बांधकाम : १२.५ एकर जमिनीवर
- गोदामे : १० मोठी लूम शेड
- यंत्रसामग्रीची यापूर्वीच विक्री
- मिलचा ताबा वस्त्रोद्योग महामंडळाकडे
- महामंडळाचे कार्यालय व दोन कर्मचारी कायम सेवेत