कागल : अनेक अडचणी, बरे-वाईट प्रसंग, अनुभव सोसून आता शाहू दूध संघ जोमाने उभारी घेत आहे. दर्जेदार उत्पादन आणि विश्वासार्हतेच्या जोरावर लोकप्रियही झाला आहे. भविष्यात ग्राहकांना घरपोहोच दूध देण्याची यंत्रणा राबविण्याबरोबरच ग्रामीण भागातही ‘शाहू मिल्क पार्लर’ ही संकल्पना राबविणार आहे, असे प्रतिपादन श्री छ. शाहू मिल्क अॅण्ड अॅग्रो प्रोड्युसर कंपनीचे कार्यकारी संचालक समरजितसिंह घाटगे यांनी केले.व्हन्नूर येथे कार्यस्थळावर कंपनीच्या आठव्या सर्वसाधारण सभेत ते मार्गदर्शन करीत होते. यावेळी कंपनीच्या संचालिका नवोदिता घाटगे प्रमुख उपस्थित होत्या.समरजितसिंह घाटगे म्हणाले, दूध संघ सुरू करतानाच या व्यवसायाबद्दल शंका-कुशंका होत्या. कारण अनेक दूध संघ बंद पडल्याचे अनुभव होते. मात्र शाहू दूध संघ हा स्वर्गीय राजे विक्रमसिंहजी घाटगे यांच्या दूरदृष्टीच्या जोरावर टिकून राहिला आणि प्रगतीपथावर देखील राहिला. आठ वर्षांत कधीही दूध उत्पादकांचे बिल थकण्याचे किंवा पुढे जाण्याची वेळ आलेली नाही. दूध संघाचे संचालक मंडळच मार्केटिंग कर्मचाऱ्यांप्रमाणे भूमिका पार पाडत आहेत. उपपदार्थांची विक्री यावर जोर दिला आहे. संघाच्या सर्व उत्पादनांना लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात मागणी आहे. म्हणून ग्राहकांना घरपोच उत्पादने देण्यासाठी यंत्रणा तयार करून गरजेनुसार डिलरलाही ती देण्यात येईल. संघामार्फत ३२५ संस्थांना पशुवैद्यकीय सेवा पुरवली आहे. रोज सरासरी ९०० किलोग्रॅम उपपदार्थ विक्री होत आहेत. त्यात दिवसेंदिवस वाढ होत आहे. चालू आर्थिक वर्षात संघाची वार्षिक उलाढाल ५६ कोटींवर पोहोचली आहे. पुढील पाच वर्षात ही उलाढाल १०० कोटीपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न राहील. स्वागत संजय बेलवळेकर यांनी, तर विषयपत्रिकेचे वाचन बी. एस. गोंधळेकर यांनी, तर आभार युवराज पसारे यांनी मानले. सभेला शाहू साखरचे उपाध्यक्ष एस. के. मगदूम, विजय औताडे, पै. दिनानाथसिंह, दीपक गोखले, दूध संघाचे संचालक पन्नुसिंह घाटगे, आनंदराव हिलगे, राजाराम चव्हाण, सुनील सूर्यवंशी, आदी उपस्थित होते. ( प्रतिनिधी )राजेसाहेबांच्या आकस्मिक निधनाने शाहू ग्रुपची जबाबदारी माझ्यावर पडली. शाहू दूध संघाचे संचालकपद स्वीकारून नवोदिता घाटगे यांनी माझ्यावरील भार कमी केला आहे. अत्यंत आत्मीयतेने आणि कल्पकतेने त्या संघाच्या कारभाराकडे लक्ष देत आहेत. पुढील वर्षी कदाचित त्या कार्यकारी संचालक म्हणूनच भाषण करतील, असे समरजितसिंह घाटगे यांनी म्हटल्यावर यावर उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला.
ग्रामीण भागातही ‘शाहू मिल्क पार्लर’
By admin | Published: September 23, 2015 11:41 PM