इचलकरंजी : येथील डायनॅमिक स्पोर्टस् क्लबच्या मैदानावर दोन दिवस झालेल्या जिल्हा कबड्डी अजिंंक्यपद निवड चाचणी स्पर्धेत पुरुष गटात सडोलीच्या शाहू संघाने व महिला गटात कोल्हापूरच्या ताराराणी संघाने अजिंंक्यपद पटकाविले. विजेत्या संघांना माजी मंत्री प्रकाश आवाडे यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. कोल्हापूर जिल्हा कबड्डी असोसिएशन आणि डायनॅमिक स्पोर्टस् क्लबच्यावतीने पुरुष आणि महिलांच्या खुल्या गटातील जिल्हा अजिंंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. शनिवार आणि रविवार असे दोन दिवस आणि सायंकाळ व रात्र अशा सत्रात ही स्पर्धा झाली. या स्पर्धेत जिल्ह्यातील तब्बल ३२ संघ सहभागी झाले होते. स्पर्धेत अनेक रंगतदार लढतीचा आनंद प्रेक्षकांना लुटता आला. महिला गटातून डायनॅमिक स्पोर्टस्, ताराराणी कोल्हापूर, महालक्ष्मी कोल्हापूर आणि कसबा ठाणे, तर पुरुष गटातून शाहू सडोली, जयहिंद, मावळा सडोली, युवा आणाजे या संघांनी विजयी घोडदौड कायम राखत उपांत्य फेरीत प्रवेश केला. पुरुष गटात शाहू सडोली विरुद्ध जयहिंंद आणि मावळा सडोली विरुद्ध युवा आणाजे या संघात, तर महिला गटात डायनॅमिक विरुद्ध ताराराणी आणि महालक्ष्मी विरुद्ध कसबा ठाणे यांच्यात उपांत्य लढती झाल्या. त्यातून पुरुष गटात शाहू सडोली विरुद्ध मावळा सडोली आणि महिला गटात महालक्ष्मी विरुद्ध ताराराणी यांच्यात अंतिम लढती झाल्या. अत्यंत चुरशीने झालेल्या या लढतीत पुरुष गटातून शाहू सडोली संघाने (११) प्रतिस्पर्धी मावळा सडोली संघाला (८) नमवत अवघ्या तीन गुणांनी अजिंंक्यपद पटकाविले; तर महिला गटातील अंतिम लढतीत ताराराणी संघाने (२४) महालक्ष्मी (१८) संघावर ६ गुणांनी मात करून विजेतेपद मिळविले. बक्षीस वितरण समारंभप्रसंगी नवमहाराष्ट्र सूतगिरणीचे अध्यक्ष राहुल आवाडे, नगरसेवक रवींद्र माने, शशांक बावचकर, बाळासाहेब कलागते, डायनॅमिक स्पोर्टस्चे अध्यक्ष संजय कुडचे, कार्यवाह प्रा. शेखर शहा, स्वप्निल आवाडे, अतुल बुगड, रमेश भेंडिगिरी, अण्णासाहेब गावडे, भगवान पवार यांच्यासह डायनॅमिकचे सर्व पदाधिकारी, खेळाडू व क्रीडाप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)
शाहू-सडोली, ताराराणी संघाला अजिंक्यपद
By admin | Published: October 27, 2015 12:38 AM