कोेल्हापूर : ‘केएसए’च्या ताब्यात असलेल्या छत्रपती शाहू स्टेडियमसह मिळकतींचे मूळ प्रयोजन बदलून विनापरवाना खरेदी-विक्री व भाडेपट्ट्याने हस्तांतरण केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अटींचा भंग केल्याप्रकरणी जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी या मिळकती सरकारजमा केल्या आहेत. त्यामुळे क्रीडा क्षेत्रात खळबळ उडाली आहे. माजी आमदार मालोजीराजे अध्यक्ष असलेल्या कोल्हापूर स्पोर्टस् असोसिएशनकडे (केएसए) या मिळकतींची मालकी होती. या स्टेडियममधील १८० गाळे भाडेकराराने देण्यात आले आहेत.
केएसएला एक रुपया नाममात्र भाडेपट्ट्याने कायम भाडेतत्त्वावर सि. स. नं. २६०७-अ, २६०७-ब, २६०८/४, २६०८/५, २६१२ या मिळकती देण्यात आल्या आहेत. त्यांचे क्षेत्र ७ एकर ३८ गुंठे असून त्या सरकारी मालकीच्या आहेत; परंतु याचे मूळ प्रयोजन बदलून अटी, शर्तींचा भंग केल्याची तक्रार प्रजासत्ताक सामाजिक संस्थेचे अध्यक्ष दिलीप देसाई यांनी जिल्हाधिकाºयांकडे तीन वर्षापूर्वी केली होती.
त्यानुसार जिल्हाधिकारी सुभेदार यांनी करवीर प्रांताधिकारी व जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख यांच्याकडून चौकशी करून अहवाल द्यावा असे आदेश दिले होते. ‘केएसए’ला ही म्हणणे सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार संबंधितांनी कागदपत्रे जमा केली. म्हणणे मांडले. त्याचा अभ्यास करून प्रांताधिकारी व जिल्हा अधीक्षक, भूमी अभिलेख यांनी सादर केलेल्या अहवालानुसार ‘केएसए’ने त्यांना सरकारकडून मिळालेल्या मिळकतींचे मूळ प्रयोजन बदलून विनापरवाना खरेदी-विक्री व भाडेपट्ट्याने हस्तांतरण करून अटी व शर्तींचा भंग केल्याचे निदर्शनास आल्याचे म्हटले आहे.
‘केएसए’ने केलेल्या खुलाशात स्वातंत्र्यपूर्व काळापासून म्हणजे १९३९ पूर्वीपासून या मिळकती कोल्हापूर संस्थानच्या मालकीच्या होत्या. या मिळकतींची प्रॉपर्टी कार्डवर हुजूर खासगी-रावणेश्वर तलाव, हुजूरखासगी-साठमारी अशा हक्काने नोंद आहे. संस्थानने १९४२ मध्ये ठराव करून या मिळकती ‘केएसए’ला प्रदान केल्या. या मिळकती संस्थानिकांच्या खासगी मिळकती म्हणून कायम झाल्यामुळे शासनाचा कोणताही संबंध आला नसल्याचे म्हटले आहे.
यावर जिल्हाधिकाºयांनी प्राप्त अहवालानुसार अटी, शर्तींचा भंग झाल्याचे ग्राह्य धरून मिळकती सरकार हक्कात जमा करण्याची कारवाई ४ जानेवारी २०१९ ला केली. ‘केएसए’ने या मिळकती संस्थानिकांच्या असल्याचे सबळ पुरावे सादर न केल्याचेही जिल्हाधिकाºयांनी आदेशात म्हटले आहे. या आदेशामुळे ७ जानेवारीला मिळकतींची प्रॉपटी कार्डावरील नोंद महाराष्ट्र शासन अशी झाली आहे.फुटबॉलचे एकमेव मैदानकोल्हापूरच नव्हे तर पश्चिम महाराष्ट्रातील फूटबॉलची पंढरी अशी शाहू स्टेडियमची ओळख आहे. त्याची मुळ रचना क्रिकेट मैदानाची आहे परंतू तिथे फुटबॉलच अधिक खेळले जाते. ही मालमत्ता कोल्हापूर संस्थांनच्या मालकीची आहे. शाहू छत्रपती, मालोजीराजे यांचे या मैदानाशी भावनिक नाते आहे. ही मालमत्ता १९३९ च्या पूर्वी संस्थानच्या खासगी मालकीची असल्याच्या स्पष्ट नोंदी आहेत.कोल्हापूर संस्थानामार्फत १५ एप्रिल १९४२ च्या ठरावाने कायमस्वरुपी प्रदान करण्यात आली आहे. तेव्हापासून ‘केएसए’ च्या ताब्यात ही मालमत्ता आहे. कांही क्षेत्र कोल्हापूर महापालिकेस संपादित करावयाचे होते त्या चौकशीवेळी देखील केएसएची मालकी मान्य करून (सिसनं २६०८/४ सिसनं २६०८/५) त्याची नोंद प्रॉपर्टी कार्डास केली आहे. संस्थेचा बिगरशेतसारा भरायचा राहिला असल्यास तो आम्ही भरायला तयार असल्याचे म्हणणे केएसएने मांडले होते.
‘केएसए’कडे असणारी जमीन ही सरकारच्या मालकीची आहे. त्यामुळे ती सरकारजमा करण्याची कारवाई केली आहे. लवकरच तिचा ताबा घेण्याची कार्यवाही जिल्हा प्रशासनाकडून केली जाईल.- अविनाश सुभेदार, जिल्हाधिकारी‘केएसए’कडे असणाºया मिळकती सरकारजमा करण्याचा जिल्हाधिकाºयांनी दिलेला आदेश अमान्य आहे. त्या संदर्भात योग्य ठिकाणी दाद मागू.- माणिक मंडलिक, मानद सरचिटणीस,के. एस. ए.मिळकतीबाबतची मूळ तक्रार तीन वर्षांपूर्वी दिली होती. त्यावर जिल्हा प्रशासनाने सुनावणी घेतल्या. प्रत्येकाला बाजू मांडण्याची संधी दिली व त्यानंतरच हा निर्णय झाला आहे. सुमारे एक हजार कोटी रुपयांची ही मालमत्ता आहे.- दिलीप देसाई, प्रजासत्ताक सेवा संस्था, कोल्हापूर