कोल्हापूर : पर्यावरण रक्षण आणि कामगारांची सुरक्षिततेबाबतच्या उत्कृष्ट गुणवत्ता व्यवस्थापनाबद्दल जर्मनीच्या टीयूव्ही राईनलँड या कंपनीने श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याला आयएसओ मानांकन प्रमाणपत्रे देऊन सन्मानित केले आहे. हे प्रमाणपत्र मिळविणारा शाहू साखर हा देशातील पहिला आणि अव्वल साखर कारखाना ठरला असल्याचे या कारखान्याचे आणि शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजित घाटगे यांनी गुरुवारी येथे पत्रकार परिषदेत सांगितले.ऊस उत्पादक शेतकरी केंद्रस्थानी मानून शाहू साखरचे संस्थापक विक्रमसिंह घाटगे यांनी शेतकऱ्यांचे हित, गुणवत्तापूर्ण उत्पादनांची निर्मिती, आर्थिक आणि कामातील शिस्त यावर आधारित कार्यसंस्कृतीचा कारखान्यात सुरुवातीपासून अवलंब केला. काळाची गरज ओळखून बदल स्वीकारल्याने शाहू साखरचा आंतरराष्ट्रीय पातळीवर वेगळा ब्रँड निर्माण झाला.
या ब्रँडची ओळख, विश्वास अधिक ठळक करण्याच्या उद्देशाने गेल्या पाच वर्षांपासून टीयूव्ही राईनलँड कंपनीचे आयएसओ प्रमाणपत्र मिळविण्यासाठी आम्ही प्रयत्न केले आहे. या कंपनीने केलेल्या सूचनांनुसार कारखान्यात विविध बदल केले. त्यामुळे आयएसओ (१४००१ :२०१५ आणि ४५००१ : २०१८) अशी दोन प्रमाणपत्रे मिळविणारा शाहू साखर हा देशातील ५२० साखर कारखान्यांमधील पहिला कारखाना ठरला असल्याचे अध्यक्ष समरजित घाटगे यांनी सांगितले. या वेळी उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे, कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण उपस्थित होते.
या मानांकनांमुळे शाहू साखर या ब्रँडला आंतरराष्ट्रीय पातळीवर अधिक बळकटी मिळणार असल्याने कारखान्याला आणि सभासदांना मोठा फायदा होणार आहे. आमच्या कारखान्याने या मानांकनांची साखर उत्पादन आणि विक्री व्यवसायात पहिल्यांदा सुरुवात केल्याचा अभिमान आहे.-समरजित घाटगे
मानांकनांची यासाठी मदतआयएसओ १४००१: २०१५ हे मानांकन पर्यावरण व्यवस्थापन कार्यपद्धतीसाठी आहे. त्यामुळे कारखान्यातून निर्माण होणाऱ्या प्रदूषकांचे प्रमाण कमी होण्यासह पाणी, वीज, वाफ यांचा काळजीपूर्वक, योग्य प्रमाणात वापर करण्यास मदत होते. आयएसओ ४५००१ : २०१८ हे मानांकन व्यावसायिक आरोग्य आणि सुरक्षा व्यवस्थापन कार्यप्रणालीसाठी आहे. कामाच्या जागेची सुरक्षितता, अपघात आणि धोक्याची संभाव्यता लक्षात घेऊन ते टाळण्याची पूर्वतयारी, योग्य सुरक्षित साधनांचा पुरवठा व वापर या कार्यप्रणालीमध्ये केले जात असल्याचे जितेंद्र चव्हाण यांनी सांगितले.कारखान्याला आतापर्यंत प्राप्त झालेली आंतरराष्ट्रीय मानांकने१) गुणवत्ता व्यवस्थापन कार्यप्रणालीसाठीचे आयएसओ ९००१:२०१५ (सन २००२ आणि २०१८)२) अन्न सुरक्षा व्यवस्थापन कार्यपद्धतीबाबतचे एफएसएससी २२०००३) अरब देशात साखर उत्पादने विक्रीसाठीचे हलाल सर्टिफिकेट४) ज्यू देशामध्ये साखर उत्पादने विक्रीसाठीचे कोशर सर्टिफिकेट