कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा समतेचा विचार देशव्यापी परिषदेच्या माध्यमातून जगभर पोहोचल्याचा अभिमान आहे. या परिषदेसाठी संशोधक, अभ्यासक, मान्यवरांनी देश-विदेशातून शुभेच्छा पाठवल्याने ही देशव्यापी नसून आंतरराष्ट्रीय परिषद ठरली असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांनी सोमवारी केले.राजर्षी शाहू छत्रपती शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जयंतीनिमित्त शाहू सलोखा मंच आणि राजर्षी शाहू स्मृतिशताब्दी समितीतर्फे येथील शाहू स्मारक भवनात ही परिषद झाली. वसंतराव मुळीक अध्यक्षस्थानी होते. डॉ. शिर्के म्हणाले, शिवाजी विद्यापीठात राजर्षी शाहू संशोधन केंद्रातर्फे शाहू प्रचाराचे कार्य अखंडपणे सुरूच आहे. यंदा राजर्षींच्या १५० व्या जयंतीनिमित्त आंतरराष्ट्रीय शाहू विचार परिषद, मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेतील राजर्षी शाहू ऑनलाइन अभ्यासक्रम तसेच कुस्ती संकुलासह विविध उपक्रम वर्षभर राबवणार आहे. शाहू जयंतीला हिंदकेसरी दीनानाथसिंह यांच्या हस्ते कुस्ती संकुलाचे उदघाटन होणार आहे.वसंतराव मुळीक म्हणाले, राज्य सरकार संगीत विद्यालय उभारण्यासाठी ४०० कोटी देऊ शकते मग राजर्षी शाहू जन्मस्थळासाठी १५० कोटी का देऊ शकत नाही? इतिहास संशोधक इंद्रजित सावंत म्हणाले, शाहूनगरीत शाहू स्मारकासाठी सातत्याने संघर्ष करत आहोत. शाहू जन्मस्थळाचा विकास २००७ पासून रखडला. आता राज्य सरकारच्या मदतीची प्रतीक्षा न करता या वर्षात ते काम आपणच पूर्ण करण्याची शपथ घेऊया असे आवाहन त्यांनी केले.धारवाड येथील मराठा मंडळासाठी राजर्षी शाहूंची प्रतिमा आणि कानपुरात शाहू विचारांचे प्रदर्शन भरवण्यासाठी लागणारी छायाचित्रे आणि कागदपत्रे देण्याचे सावंत यांनी जाहीर केले. बबन रानगे यांनी स्वागत केले. स्वप्निल पन्हाळकर यांनी सूत्रसंचालन केले. संजय कांबळे यांनी आभार मानले. यावेळी गणी आजरेकर, कादर मलबारी, सुभाष जाधव, संजय शेटे, अशोक भंडारे, दगडू भास्कर, शैलजा भोसले, चंद्रकांत चव्हाण, शाहिर दिलीप सावंत उपस्थित होते.८० समाज प्रतिनिधींचा सन्मानशाहूंच्या विचारांचे कार्य करणाऱ्या सुरेश शिपूरकर, व्यंकाप्पा भोसले, सुंदरराव देसाई, दिलीप पवार, किसन कुऱ्हाडे, बी. ए. पाटील, यांच्यासह ८० शाहूप्रेमी समाजप्रतिनिधींचा तसेच धारवाडचे मंजूनाथ कदम, विजय भोसले, नवीन कदम, कानपूरचे प्रदीप कटीयार, संजय कटियार, ॲड. शशिकांत सच्चान यांचा सत्कार कुलगुरूंच्या हस्ते केला.
शाहू विचार परिषद देशव्यापी नव्हे आंतरराष्ट्रीय : डॉ. डी. टी. शिर्के
By संदीप आडनाईक | Published: June 24, 2024 7:42 PM