गौरव सांगावकरराधानगरी : सध्या राधानगरीधरणात केवळ १.७६ टीएमसी पाणीसाठा शिल्लक असल्याने धरणाची पाणी पातळी कमी होत आहे. त्यामुळे धरणाच्या मध्यभागी असणारी शाहूकालीन वास्तू ‘बेनझिर व्हिला’ पर्यटकांसाठी तब्बल चार वर्षांनी खुली होत आहे.१९७२ च्या दुष्काळी वर्षाचा अपवाद वगळता, बेनझीर व्हिला २०१६ व २०१९ ला खुला झाला होता. त्यानंतर तब्बल चार वर्षांनी धरणातील पाणी पातळी घटल्यामुळे तिसऱ्यांदा हा बेनझीर व्हिला खुला होत आहे.ही वास्तू जलाशयाच्या मुख्य भिंतीपासून राऊतवाडी गावाच्या दिशेला एक किलोमीटरवर आहे. धरणाच्या मुख्य भिंतीवरून ही वास्तू पर्यटकांच्या नजरेस पडते. पर्यटकांना राऊतवाडी मार्गे बेनझिर व्हिला पर्यंत पोहोचता येते. अगदी क्वचित प्रमाणात पाणी असल्याने पर्यटक बेनझीर व्हिलापर्यंत जात आहेत. वास्तूची सद्य:स्थिती म्हणावी तेवढी समाधानकारक नाही. पाण्याच्या मधोमध असल्याने वास्तूमध्ये अनेक प्रकारच्या झुडपांनी वेढली गेली आहे.पुरातन बांधकाम असल्याने अनेक ठिकाणी त्याची काळानुरूप पडझड झाली आहे. शाहूप्रेमींनी स्वच्छता मोहीम केल्यानंतरच ऐतिहासिक बेनझिर व्हीला पाहण्यासाठी पर्यटकांना प्रवेश करता येणार आहे.बेनझिर व्हिला इतिहास : धरण बांधकामत कोणतीही त्रुटी राहू नये. बांधकामावर प्रत्यक्ष देखरेख ठेवता यावे यासाठी राजर्षी शाहू महाराजांनी धरणासमोर मध्यभागी असणाऱ्या बेटावर वास्तू बांधली. या धरणाच्या बांधकाम पाहण्यासाठी स्वतः शाहू महाराज येऊन या वास्तूत वास्तव्य करत होते. या वास्तूला ‘बेनझीर व्हिला’ असे नाव देण्यात आले.
Kolhapur News: शाहूकालीन ‘बेनझिर व्हिला’ खुला; राधानगरी धरणातील पाणीसाठ्यात घट झाल्याने पर्यटकांना पर्वणी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2023 4:34 PM