कोल्हापूर : लोकनेते राजर्षी छत्रपती शाहू महाराज, रणरागिणी ताराराणी अन् सद्य:स्थितीवर प्रकाशझोत टाकत शाहूंच्या विचारांचा जागर शाहिरांनी पोवाड्यातून सादर केला. कोल्हापुरात मंगळवारी राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टतर्फे १४२ व्या शाहू जयंती उत्सवानिमित्त राजर्षी शाहू व्याख्यानमालेला सुरुवात झाली. यावेळी येथील शाहीर संजय गुरव, दिलीप सावंत, भुदरगडमधील शाहीर डॉ. राजीव चव्हाण, बालशाहीर तृप्ती सावंत, दीप्ती सावंत यांनी अप्रतिम पोवाडे सादर केले. शाहीर शहाजी माळी, शाहू स्मारक भवनचे व्यवस्थापक राजदीप सुर्वे, कृष्णाजी हिरुगडे यांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन करून व्याख्यानमालेचे उद्घाटन झाले. भगवे फेटे परिधान करून सुरेश काडगावकर, कपिल साळोखे यांनी ढोलकीची साथ देत संजय गुरव यांनी ‘तुम्हा माझा मानाचा मुजरा शाहू राजे’ या पोवाड्याने सुरुवात केली. त्यांनी ‘जय राजर्षी शाहू राजे’, तर बालशाहीर तृप्ती सावंत हिने ‘जय राजर्षी शाहू राजे तुझला हा मुजरा’ म्हणत ताराराणीचा पोवाडा सादर केला. त्यानंतर शाहीर दिलीप सावंत यांनी शाहूंच्या विचारांचा जागर करत शाहू महाराज, जोतिराव फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या विचारांवर राजकारण करत राज्यकर्त्यांनी माणसातील माणूसपण हरवून टाकले आहे, असा पोवाड्यातून जागर केला. त्याला उपस्थितांनी टाळ्यांनी दाद दिली. शाहीर डॉ. राजीव चव्हाण यांनीही राजर्षी शाहू महाराजांवर पोवाडा सादर केला. यावेळी ग्रामीण भागातील पोवाडा शौकिनांनी गर्दी केली होती. (प्रतिनिधी)ऐतिहासिक विषयाचे विकृतीकरण घातक : पवारआज पोवाड्यातून समाजप्रबोधनाचे काम सुरू आहे, हे कौतुकास्पद आहे. परंतु, काहीजण समाजप्रबोधनाऐवजी ऐतिहासिक विषयांच्या विकृतींचा गैरवापर करीत आहेत. हे समाजाबरोबर राष्ट्रालाही घातक आहे. त्यामुळे राष्ट्रधर्माचे पालन करावे, असे आवाहन ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांनी यावेळी केले.आजचे व्याख्यान : बुधवारवक्ते : डॉ. हरी नरके, पुणेविषय : डॉ. बाबासाहेब आंबेडकर व भारतीय राज्यघटना अध्यक्ष : डॉ. जयसिंगराव पवार, ज्येष्ठ इतिहास संशोधकवेळ : सायंकाळी ५.३० वा.स्थळ : शाहू स्मारक भवन
शाहूंच्या विचारांचा ‘जागर’
By admin | Published: June 22, 2016 12:02 AM