लोकमत न्यूज नेटवर्क
मलकापूर : शाहूवाडी तालुक्यात ४१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे . ऐन थंडीत गावागावांत राजकीय वातावरण तापले आहे. तेथील राजकीय गट सतर्क झाले आहेत. पक्षापेक्षा स्वतंत्र गटाने निवडणूक लढवा, असा दम गटनेत्यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे. त्यामुळे ग्रामपचायतीची निवडणूक पक्षाच्या चिन्हावर न होता स्वतंत्र गटावरच होताना दिसत आहे. त्यामुळे सध्यातरी पक्षीय झेंडा बाजूला ठेवण्यात आला आहे.
शाहूवाडी तालुक्यात गेल्या अनेक वर्षांपासून गटाच्या राजकारणाची चलती आहे. पक्षाच्या चिन्हाचा विधानसभा निवडणुकीसाठी वापर केला जात असतो. ग्रामपंचायतीची निवडणूक सुरू आहे. उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. गावात आपल्या गटाची ग्रामपंचायतीवर सत्ता येण्यासाठी गावातील गटप्रमुख कामाला लागले आहेत. आपल्या सोयीनुसार युती करून ग्रामपंचायत ताब्यात ठेवायची; मात्र अशा गटप्रमुखांना गटनेत्यांनी युती न करता आपल्या स्वतंत्र गटाचे अस्तित्व ठेवून निवडणूक लढविण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे गावातील गटप्रमुखांनी नेत्यांचा आदेश मानून कामाला सुरुवात केली आहे.
तालुक्यात जनसुराज्य शक्ती पक्षाचे आमदार डॉ. विनय कोरे, शिवसेनेचे माजी आमदार सत्यजित पाटील, काँग्रेसचे करणसिंह गायकवाड, राष्ट्रवादीचे मानसिंगराव गायकवाड यांचे मजबूत गट आहेत. या चार गटांतच निवडणुकीची रणधुमाळी सुरू असते. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेना ग्रामपंचायत निवडणूक लढविणार असून, काही गावांत स्वाभिमानी शेतकरी संघटना मैदानात उतरणार आहे. तालुक्यात जनसुराज्य व काँग्रेस यांची युती आहे, तर शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आघाडी आहे. नेत्यांनी केलेल्या विकासकामांचा उपयोग या निवडणुकीत प्रत्येक गटाला होणार आहे. काही गावांतील मुरब्बी गटप्रमुख नेत्यांचा आदेश धाब्यावर बसवून गावात आपले वर्चस्व राखण्यासाठी सेना - जनसुराज्य, जनसुराज्य - राष्ट्रवादी, काँग्रेस - सेना अशा छुप्या युती होताना दिसत आहे.