मलकापूर : शाहूवाडी तालुक्यातील भेंडवडे - उदगिरी रस्ता करण्यास शासनाच्या वन्यजीव विभागाने परवानगी दिल्याबद्दल शाहूवाडी पंचायत समितीच्या बैठकीत वन्यजीव विभागाच्या अभिनंदनाचा ठराव करण्यात आला. सभेच्या अध्यक्षस्थानी सभापती विजय खोत होते.
स्वागत गटविकास अधिकारी अनिल वाघमारे यांनी केले. शाहूवाडी पंचायत समिती स्तरातून १५ व्या वित्त आयोगातून अल्फोन्सा कोविड सेंटरमधील रुग्णासाठी बेड वाढविण्यासाठी तीन लाख रुपयांचा निधी देण्याचा ठराव करण्यात आला.
उदगिरी येथील श्री काळाम्मा देवीच्या मंदिराकडे व उदगिरी गावाकडे जाण्यासाठी कच्चा रस्ता आहे. हा रस्ता वन्यजीव विभागाच्या हद्दीतून गेला आहे. माजी आमदार सत्यजित पाटील यांनी रस्ता डांबरीकरणासाठी पाच कोटी ५० लाख रुपयांचा निधी तीन वर्षांपूर्वी मंजूर केला होता. मात्र, वन्यजीव विभागाने रस्ता करण्यास विरोध केला. वनाधिकारी नंदकुमार नलवडे यांनी शासनाकडे प्रस्ताव दाखल केला होता. वन्यजीव विभागाचे विभागीय वनअधिकारी महादेव मोहिते यांनी रस्ता करण्यास तातडीने मंजुरी दिल्याबद्दल वन्यजीव विभागाचा अभिनंदनाचा ठराव सभापती विजय खोत यांनी मांडला. अल्फोन्सा व डॉ एन. डी. पाटील कोविड सेंटर ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी कोविड रुग्णांची चांगली सेवा करीत असल्याबद्दलचा अभिनंदनाचा ठराव उपसभापती दिलीप पाटील यांनी मांडला. तो ठराव सर्वानुमते पास करण्यात आला. बांधकाम विभागाने तालुक्यातील अंगणवाडी इमारतीचे बांधकाम पूर्ण करून दिले आहे. मात्र, अंगणवाडी पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका यांचा इमारतीसमोर उभे राहून फोटो काढून द्या, तरच बिल दिले जाईल, असे बांधकाम विभागाचे उपअभियंता ए. एस. गायकवाड यांनी सांगितले. संबंधित विभागाशी चर्चा करू, असे गटविकास अधिकारी अनिल वाघमारे यांनी सांगितले.
बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. सभेस सदस्य अमर खोत, लतादेवी पाटील, अश्विनी पाटील , डॉ. स्नेहा जाधव, आदींसह सर्व सदस्य, सदस्या उपस्थित होते.