सरुड : अनिल पाटील लोकमत न्यूज नेटवर्क
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर शासनाने कडक निर्बंध लावत संचारबंदी जाहीर केली असली तरी शाहूवाडी तालुक्यातील बांबवडे, सरूड, मलकापूर, करंजफेण आदी बाजारपेठांच्या गावांसह इतर मोठ्या गावांमध्ये होत असलेली नागरिकांची गर्दी पाहता या तालुक्यात शासनाने संचारबंदीमध्ये घालून दिलेल्या नियमांचे पूर्णपणे उल्लंघन होत असल्याचे दिसून येत आहे. परिणामी तालुक्यात सोशल डिस्टन्सिंगचा व संचारबंदीचा पुरता फज्जा उडाला आहे. तालुक्यात संचारबंदी ही नावापुरतीच राहिली आहे. बाजारपेठांमध्ये होत असलेल्या गर्दीपुढे पोलीस यंत्रणाही हतबल झाल्याचे दिसून येत आहे . बाजारपेठांमधील नागरिकांची हीच गर्दी उद्या शाहूवाडीकरांसाठी धोक्याची घंटा ठरू शकते.
सध्या कोरोनाच्या वाढत चाललेल्या प्रादुर्भावामुळे शासनाने गुरुवारपासून संपूर्ण राज्यात संचारबंदी घोषित केली आहे; परंतु अनेक नागरिक अत्यावश्यक वस्तू खरेदीच्या नावाखाली नियमांचे उल्लंघन करत बाजारपेठांमध्ये मुक्तपणे संचार करत असल्याचे चित्र शाहूवाडी तालुक्यातील प्रमुख बाजारपेठांसह गावागावांत दिसत आहे. यामध्ये विनाकारण फिरणाऱ्यांची संख्याही जास्त आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाच्या वतीने शासन आदेशांचे पालन करण्याच्या सूचना वारंवार देण्यात येत आहेत; परंतु ‘अत्यावश्यक सेवे’च्या नावाखाली काही दुकानदारांकडून व अतिउत्साही नागरिकांकडून या सूचनांना हरताळ फासला जात असून त्यांच्याकडून शासन नियमांची पायमल्ली होत आहे. तालुक्यातील बाजारपेठेच्या गावांमधील अनेक दुकानांमध्ये संचारबंदीच्या नियमांचे उल्लघंन होत आहे. संचारबंदीच्या काळात जी दुकाने सुरू करायला परवानगी नाही अशी अत्यावश्यक सेवेत नसणारी दुकानेही सुरू आहेत. परिणामी बाजारपेठांमधील नागरिकांची गर्दी वाढून बाजारपेठांमध्ये संचारबंदीचा फज्जा उडाला आहे. त्यातूनच विनाकारण घराबाहेर पडणे, वाहनांचा मुक्त वापर करणे, सोशल डिस्टन्सिंग न ठेवणे, मास्कचा वापर न करणे आदी प्रकार घडत असून हे प्रकार भविष्याच्या दृष्टीने धोकादायक ठरू शकतात याचे विस्मरणच नागरिकांना झाले असल्याचे दिसत आहे. अशा गर्दीतूनच तालुक्यात कोरोनाचा मोठा प्रकोप होऊन तालुक्यात गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यताही नाकारता येत नाही.
चौकट
पोलीस यंत्रणा हतबल
शाहूवाडी तालुक्यात पोलिसांच्या कारवाईचा धाक राहिला नसल्यानेच सध्या संचारबंदीमध्ये तालुक्यातील बाजारपेठांच्या ठिकाणी तसेच रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात नागरिक मुक्तपणे वावरत असल्याचे दिसून येत आहे . बांबवडे येथे पोलीस चौकीसमोरच्या चौकातच नागरिकांची होत असलेली मोठी गर्दी हे पोलीस प्रशासनाच्या हतबलतेचे उदाहरण आहे.