संजय पाटील ।सरूड : राज्य लोकसेवा आयोगाने घेतलेल्या पोलीस उपनिरीक्षक परीक्षेत शाहूवाडी तालुक्याचा पुन्हा एकदा डंका वाजला आहे. राहुल चंद्रकांत आपटे, अमित शिवाजी नांगरे-पाटील, शुभांगी सतीश तडवळेकर-रेडेकर (सर्व रा. सरुड, ता. शाहूवाडी), तर सचिन आनंदा रेडकर, आरती सचिन रेडकर या थेरगाव येथील पती-पत्नीसह सुजाता शिवाजी नांगरे-पाटील (शिरगाव) यांनी यशाचा झेंडा फडकाविला.
राहुल आपटे याने भटक्या जमाती (ब) प्रवर्गातून महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांक पटकाविला आहे. राहुल अवघा नऊ वर्षांचा असताना कोल्हापूर पोलीस दलाच्या सेवेत कार्यरत असलेले वडील चंद्रकांत आपटे यांचे अकाली निधन झाले. सरस्वती चुनेकर विद्यामंदिर कोल्हापूर येथे मुख्याध्यापक असलेली आई पूजाताई यांच्या एकमेव छत्रछायेखाली राहुलने त्यांच्याच शाळेत प्राथमिक, माध्यमिक, तर भारती विद्यापीठाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातून पदवी शिक्षणात विशेष प्रावीण्यासह यश मिळविले. राहुलने तिसऱ्या प्रयत्नात उपनिरीक्षक पदाला गवसणी घातली.
शुभांगी तडवळेकर-रेडेकर यांचे माहेर थेरगाव. लग्नानंतर त्या ‘सरुडकर’ झाल्या. शेंद्रे, (जि. सातारा) येथील अजिंक्यतारा शाळेतून शिकलेल्या शुभांगी यांनी यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट आॅफ सातारा येथून बीएस्सी, तर शिवाजी विद्यापीठातून एमएस्सी हे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. पोलीस दलांतर्गत राज्य गुप्तवार्ता विभागात २०११ साली त्या भरती झाल्या आहेत. सन २०१६ मध्ये सरुड येथील सतीश तडवळेकर यांच्याशी त्यांचा विवाह झाला. पती सतीश हे पुण्यातील प्रायव्हेट सेक्टरमध्ये उच्च पदावर कार्यरत आहेत. त्यांचे दीर संदेश हेही गेल्यावर्षी उत्पादन शुल्क निरीक्षक परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. सरुड गावातील राहुल व शुभांगी यांच्याच बरोबरीने यावेळी अमित शिवाजी नांगरे-पाटील हा ‘पीएसआय’ म्हणून किंबहुना आणखी एक अधिकारी अधिकाºयांच्या यादीत समाविष्ट झाला. अमित शिक्षणात नेहमीच ‘टॉपर’ राहिला आहे. पुणे येथून बी. ई. मेकॅनिकल झालेला अमित कोल्हापुरातील प्री आयएएस ट्रेनिंग सेंटरचा विद्यार्थी आहे.
शिरगाव (ता. शाहूवाडी) येथील सुजाता नांगरे-पाटील या सैन्यदलात कार्यरत शिवाजी नांगरे-पाटील यांच्या पत्नी आहेत. सैनिक पतीच्या प्रबळ इच्छेखातर आज त्या पीएसआय झाल्या आहेत. सुजाता यांचे प्राथमिकसह माध्यमिक शिक्षण माहेरच्या आंबर्डे-शिराळा (ता. शाहूवाडी) शाळेत झाले. मलकापूरच्या ग. रा. वारंगे कॉलेजमधून उच्च माध्यमिक शिक्षणानंतर त्यांनी ‘डी. एड्’ हे व्यावसायिक शिक्षण पूर्ण केले. २०१२ साली त्या शिवाजी यांच्याशी विवाहबद्ध झाल्या. सैनिकी सेवेत गुजरात सीमेवर दोन वर्षे कार्यरत असलेल्या पतीबरोबर वास्तव्यास असताना सुजाता यांच्यातील टॅलेंट ओळखून पती शिवाजी यांनी पुढील शिक्षणासाठी प्रवृत्त केल्यामुळे सुजाता यांनी प्रथम ‘एक्स्टर्नल पदवी’ प्राप्त केली. त्यानंतर पतीच्याच आग्रहाखातर त्या स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी २०१४-१५ मध्ये अरुण नरके फाउंडेशनच्या मार्गदर्शन केंद्रात दाखल झाल्या. त्यापुढील काळात सेल्फस्टडी करून केवळ दुसºया प्रयत्नात हे यश मिळवून त्यांनी आपल्या सैनिक पतीचा विश्वास सार्थ ठरवून संसारातील समस्त स्त्री वर्गाला त्या नक्कीच आदर्श ठरल्या आहेत.थेरगाव येथील आरती आणि सचिन रेडकर या दाम्पत्यानेही पीएसआय परीक्षेत एकाच वेळी आदर्शवत यश मिळविले आहे.
आरती या सध्या हुपरी ठाण्यात पोलीस म्हणून कार्यरत आहेत. कोल्हापूर येथील मॉन्टेसरी व ताराराणी विद्यापीठातून अनुक्रमे प्राथमिक, उच्च माध्यमिक शिक्षणाचे धडे घेत यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून पदवी शिक्षण पूर्ण केलेल्या आरती या स्वअध्ययनाच्या जोरावर पीएसआय परीक्षा उत्तीर्ण झाल्या आहेत.त्यांचे पती सचिन रेडकर यांनी थेरगाव केंद्रीय शाळेत प्राथमिक, विश्वास विद्यानिकेतन (चिखली) येथे माध्यमिकचे धडे घेत दापोली कृषी विद्यापीठांतर्गत चोरगे कृषी महाविद्यालय, चिपळूण येथून ‘बीएस्सी अॅग्री’ ही पदवी संपादित केली आहे.