(फोटो-२९०५०२१-कोल-सर्जेराव माने)
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कसबा बावडा येथील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सर्जेराव दिनकर माने (भेंडवडे, ता. हातकणंगले) यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला असून, शुक्रवारच्या संचालक मंडळाच्या सभेत तो मंजूर करण्यात आला. कारखान्याची निवडणूक तोंडावर असताना माने यांचा राजीनामा कारखान्याचे सर्वेसर्वा महादेवराव महाडीक यांना हादरा मानला जात आहे. हातकणंगले तालुक्यातील सत्तारूढ गटाची गणित काहीसे बिघडणार, हे निश्चित आहे.
राजाराम कारखान्याचे हातकणंगले, करवीर व राधानगरी तालुका कार्यक्षेत्र आहे. हातकणंगले तालुक्यात सर्वाधिक सभासद असल्याने आजपर्यंत कारखान्यावर याच तालुक्याचे वर्चस्व राहिले आहे. गेली अनेक वर्षे कारखान्यावर महादेवराव महाडीक यांचे प्राबल्य आहे. कारखान्याच्या मागील निवडणुकीत पालकमंत्री सतेज पाटील यांनी सत्तारूढ महाडीक गटाला जोरदार टक्कर दिली होती. पॅनल थोड्या मतांनी पराभूत झाल्यानंतर, मंत्री पाटील यांनी पाच वर्षांत नव्याने बांधणी सुरू केली. वाढीव सभासदांसह कार्यक्षेत्राबाहेरील सभासद कमी केल्याने निवडणुकीत रंगत येणार आहे. मागील निवडणुकीतील कच्चे दुवे शोधून त्या बाजू भक्कम करण्याचा प्रयत्न मंत्री पाटील यांचा आहे.
भेंडवडे, लाटवडे, कुंभोज, नरंदे या गावात सर्जेराव माने यांना मानणारे सुमारे ७०० सभासद आहेत. माने यांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी मंत्री पाटील यांनी प्रयत्न सुरू केले हाेते. ‘गोकूळ’च्या निवडणूक प्रचार सभेत माने यांचे सुपूत्र अभिजित माने हे मंत्री पाटील यांच्या व्यासपीठावर होते. त्याचवेळी माने आगामी काळात काय भूमिका घेणार, हे निश्चित झाले होते.
कोरोनामुळे कारखान्याची निवडणूक लांबणीवर पडली असली, तरी दोन्ही गटांनी तयारी सुरू केली आहे. त्याचाच भाग म्हणून सर्जेराव माने यांनी अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. माने हे गेली वीस वर्षे संचालक, दोन वेळा उपाध्यक्ष तर २०१५ ते २०१८ व २९ नाेव्हेंबर २०१९ पासून अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. माने यांच्या भूमिकेने ‘राजाराम’च्या राजकारणात महादेवराव महाडीक यांना हादरा मानला जात आहे.
माने यांचे मन वळण्यात अपयश
वयोमानानुसार आपण कारखान्याची आगामी निवडणूक लढविणार नाही, असे सर्जेराव माने यांनी दीड वर्षापूर्वीच महादेवराव महाडीक यांना सांगितले होते. या कालावधीत माने यांचे मन वळण्याचा प्रयत्न झाला, मात्र त्यांनी नकार दिल्याने शुक्रवार (दि. २८)च्या संचालक मंडळाच्या बैठकीत त्यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला.
‘अभिजित’यांची विरोधी पॅनलमधून उमेदवारी निश्चित
माने यांच्या भेंडवडे परिसरातील नेटवर्कचा फायदा करून घेण्यासाठी सर्जेराव माने यांचे सुपूत्र अभिजित माने यांना विरोधी पालकमंत्री सतेज पाटील यांच्या पॅनलमधून उमेदवारी निश्चित केली आहे.
कोट-
वयोमान आणि प्रकृतीमुळे आपणाला जमत नसल्याने तीन-चार दिवसांपूर्वी राजीनामा दिला, तो शुक्रवारी मंजूर केला. पुढील दिशा ज्या त्यावेळी ठरवली जाईल.
- सर्जेराव माने (माजी अध्यक्ष, राजाराम कारखाना)