कोल्हापूर : शक्तिपीठ महामार्ग रद्द न करणाऱ्या महायुतीचे १२ जिल्ह्यांतील ७२ उमेदवार पराभूत करण्याचा निर्धार कोल्हापुरात सोमवारी झालेल्या राज्यव्यापी निर्धार परिषदेत शेतकऱ्यांनी ठरावाद्वारे केला. कोल्हापुरात शाहू स्मारक भवन येथे सोमवारी शक्तिपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांची राज्यव्यापी निर्धार परिषद पार पडली. या परिषदेत शक्तिपीठ महामार्ग बाधित १२ जिल्ह्यांतील शेतकरी सहभागी झाले होते. परिषदेचे उद्घाटन खासदार शाहू छत्रपती यांच्या हस्ते झाले. या परिषदेत माजी आमदार संजयबाबा घाटगे, राष्ट्रवादीचे नेते समरजित घाटगे, किसान सभेचे राज्य अध्यक्ष उमेश देशमुख, अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष राजन क्षीरसागर, भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या दिल्ली राज्य सहसचिव डॉ. प्रा. अमृता फाटक, गिरीश फोंडे, उद्धवसेनेचे नेते विजय देवणे, प्रकाश पाटील, विक्रांत पाटील, सुभाष जाधव, आनंदा पाटील, दादा पाटील, योगेश कुळवमोडे, के. डी. पाटील यांनी मार्गदर्शन केले.खासदार शाहू छत्रपती म्हणाले, शक्तिपीठ महामार्ग विरोधात मार्च महिन्यापासूनच कोल्हापुरातील शेतकरी अत्यंत आक्रमकपणे आंदोलन करत आहेत, परंतु सत्तारूढ सरकारने कोणतीही ठोस भूमिका घेतली नाही. त्यामुळे आता राजकीय परिवर्तन झाल्याखेरीज शक्तिपीठ महामार्ग रद्द होणार नाही. संजयबाबा घाटगे म्हणाले, आचारसंहिता सुरू होण्यापूर्वी शक्तिपीठ महामार्ग रद्दची लेखी घोषणा होईल याकडे शेतकरी आशेने पाहत होते. पण, महायुती सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली. समरजित घाटगे म्हणाले, शक्तिपीठ महामार्गाबाबत सर्वच शेतकऱ्यांमध्ये खदखदत असणाऱ्या असंतोषाला वाट मिळाली आहे. अनेक तालुक्यांमध्ये महायुतीच्या उमेदवारांना शेतकरी प्रचारादरम्यान अडवून जाब विचारत आहेत. गिरीश फोंडे म्हणाले, महायुती सरकारने महामार्ग रेटण्याचे ठरवलेले होते. त्यामुळे आंदोलन सुरू असतानाही त्यांनी कोणतीच ठोस भूमिका घेतली नाही.या परिषदेत बीड येथील लालासाहेब शिंदे, लातूर येथील अनिल ब्याळे, धनपाल गवळी, सांगली येथील उमेश येडगे, नांदेड येथील सतीश कुलकर्णी, सोलापूर येथील गणेश घोडके, परभणी येथील विठ्ठल गरूड, आदी शेतकरी सहभागी झाले. शिवाजी मगदूम यांनी प्रास्ताविक केले. दादासाहेब पाटील यांनी आभार मानले. यावेळी सम्राट मोरे, आनंदा पाटील, प्रकाश पाटील, कृष्णात पाटील, शिवाजी कांबळे, सुधाकर पाटील, शिवाजी पाटील, युवराज शेटे, योगेश कुळवमोडे, नितीन मगदूम, दादासो पाटील, युवराज कोईंगडे, मच्छिंद्र मुगडे, जालिंदर कुडाळकर, साताप्पा लोंढे, तानाजी भोसले, आनंदा देसाई उपस्थित होते.
शक्तिपीठ महामार्गास विरोध, महायुतीचे १२ जिल्ह्यांतील ७२ उमेदवार पाडणार; शेतकऱ्यांचा कोल्हापुरात ठराव
By संदीप आडनाईक | Published: October 21, 2024 5:58 PM