हुपरी : हुपरी (ता. हातकणंगले) येथील श्री नामदेव शिंपी समाज उन्नती मंडळाच्या जागेवरील अतिक्रमण ३० दिवसांत काढण्याची नोटीस अतिक्रमणधारकास देणे व याप्रश्नी न्यायालयात कॅव्हेट दाखल करण्याचे आश्वासन नगरपरिषद प्रशासनाने दिले होते; पण या आश्वासनाची पूर्तता अद्यापपर्यंत झाली नाही. त्यामुळे याप्रश्नी न्याय मागण्यांसाठी समाजाच्यावतीने सोमवारपासून नगरपरिषद कार्यालयासमोर पुन्हा एकदा बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आहे. मंगळवार हा आंदोलनाचा दुसरा दिवस होता.
येथील सिटी सर्व्हे क्रमांक २८०० मध्ये श्री नामदेव शिंपी समाजाने मंदिर उभारले आहे. या मंदिराच्या जागेतच इंग्रोळे बंधूंनी अतिक्रमण केले आहे. समाजाने काही दिवसांपासून या जागेभोवती कंपाऊंड घालण्याचे काम सुरू केले आहे. कंपाऊंड घालतेवेळी समाजाने आणखी काही जागा सोडावी, अशी अडवणूक इंग्रोळे बंधूंनी केली आहे. त्यामुळे समाजावर हा अन्याय असून, नगरपरिषदेने इंग्रोळे बंधूंचे हे अतिक्रमण काढावे, या मागणीसाठी नोव्हेंबरमध्ये उपोषण केले होते. अद्याप कारवाई न झाल्याने पुन्हा सोमवारपासून नगरपरिषद कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. या उपोषणात उदय माळवदे, प्रकाश पतंगे यांचा सहभाग आहे.