कोल्हापूर : राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त बुधवारी शहरासह ग्रामीण भागात विविध उपक्रम राबविण्यात आले. सकाळी आठ वाजता पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शाहू महाराज यांच्या लक्ष्मी विलास पॅलेस येथील जन्मस्थळी त्यांच्या प्रतिमेस अभिवादन केले. दसरा चौक, मिरजकर तिकटी येथून भव्य रॅली काढण्यात आली. याशिवाय वृक्षारोपण, गरिबांना मदत, रक्तदान असे अनेक उपक्रम राबवून राजर्षी शाहू जयंती लोकोत्सव म्हणून साजरी झाली.
कोल्हापूर : राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त बुधवारी सकाळी आठ वाजता पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी शाहू महाराज यांच्या लक्ष्मी विलास पॅलेस येथील जन्मस्थळी त्यांच्या प्रतिमेस अभिवादन केले.
मंत्री पाटील यांच्यासमवेत उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष योगेश जाधव, आमदार सतेज पाटील, महापौर सरिता मोरे, उपमहापौर भूपाल शेटे, जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिकेचे आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार, प्रांताधिकारी सचिन इथापे, नगरसेवक डॉ. संदीप नेजदार, सुरेखा शहा, मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक, इंद्रजित सावंत यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
यावेळी लंडन येथून आणलेले शाहू महाराजांचे भव्य छायाचित्र पाहून पालकमंत्री पाटील भारावून गेले. यासोबतच त्यांनी या वास्तूतच विकसित केलेले पहिले दालनही पाहून समाधान व्यक्त केले. शाहू महाराजांचे जनक आई, वडील आणि ज्यांनी दत्तक घेतले ते आई-वडील यांची छायाचित्रे या दालनामध्ये लावण्यात आली आहेत.
यावेळी वसंतराव मुळीक यांनी जन्मस्थळाच्या कामाबाबत आपण जातीने लक्ष घालावे, अशी विनंती पालकमंत्र्यांना केली. तेव्हा पाटील यांनी, शासकीय नियमाप्रमाणेच निविदा प्रक्रिया राबवली आहे. त्यानुसार आपल्याला चांगले काम करून घ्यावे लागेल, असे स्पष्ट केले. पुरातत्त्व विभागाचे पुणे विभागाचे उपसंचालक विलास वहाणे, कोल्हापूर वस्तुसंग्रहालयाचे अभिरक्षक अमृत पाटील यांनी यावेळी जन्मस्थळी चाललेल्या कामाबाबत माहिती दिली.
सकाळी नऊच्या सुमारास शाहू पुतळ्यास शाहू छत्रपती यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला आणि संपूर्ण दसरा चौक शाहूराजांच्या विजयघोषणांनी दुमदुमून गेला. यावेळी वरील मान्यवरांसोबतच अतिरिक्त पोलीस अधीक्षक तिरूपती काकडे, समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त बाळासाहेब कामत यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
महाराष्ट्र हायस्कूलच्या नऊवारी साडीतील मुलींच्या लेझीम पथकाने यावेळी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. प्रिन्स शिवाजी बोर्डिंगच्या गर्ल्स हायस्कूलच्या मुलींनी मर्दानी खेळ सादर केले. प्रायव्हेट हायस्कूलने उत्तर प्रदेशच्या कुर्मी समाजाने महाराजांना दिलेल्या ‘राजर्षी’ या पदवी प्रदान सोहळ्याचे सादरीकरण केले; तर एस. एम. लोहियाच्या चित्ररथावर महाराजांची अस्वलाशी झुंज रंगली होती. दसरा चौकातील शाहू शिक्षण संस्थेने जिवंत कुस्तीचा, तर उषाराणी विद्यापीठाने शिक्षणाचा देखावा सादर केला. राजमाता गर्ल्स हायस्कूलने राधानगरी धरण आणि शेतकरी यांचा; तर नेहरू हायस्कूल, कोल्हापूर आर्य समाज संस्थांनीही देखावा सादर केला. कळंबा गर्ल्स हायस्कूलचे झांजपथकही लक्षवेधी ठरले. पोलीस बँडनेही वातावरणनिर्मिती केली. सामाजिक न्याय विभागाच्यावतीनेही चित्ररथाद्वारे माहिती देण्यात आली.का सीएसआरमधून काम करूया ?वसंतराव मुळीक यांनी जन्मस्थळाच्या कामाबाबत ठेकेदाराला अजूनही ब्लॅकलिस्ट केले नसल्याचे सांगितले. तेव्हा मंत्री पाटील म्हणाले, अहो शासकीय नियमाप्रमाणे निविदा काढल्यानंतर जर ठेकेदाराने ते घेतले असेल तर ते काम करून घ्यायला हवे. बंटी यांची मान्यता असेल तर मग मी सीएसआरमधून काम करू का?चित्ररथ, धनगरी ढोल अन् राजर्षींचा जयघोषशाहूप्रेमींची जंगी मिरवणूक : उलगडला जीवनपटकोल्हापूर : कोल्हापूर शहर सर्वसमावेशक राजर्षी शाहूप्रेमी नागरिक समितीच्या वतीने बुधवारी राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त जंगी मिरवणूक काढण्यात आली. शाहूंच्या जीवनावरील चित्ररथ, धनगर ढोलांचा निनाद, विविध वाद्यांचा गजर व शाहूंच्या जयघोषाने सारा परिसर दुमदुमला होता.
राजकीय पक्ष, संघटना, पेठांतील तालीम संस्था, तरुण मंडळांसह कोल्हापूर शहरातील शाहूप्रेमी नागरिकांच्या वतीने बुधवारी राजर्षी शाहू महाराज यांचा जयंती सोहळा आयोजित केला होता. सकाळी १0 वाजता मिरजकर तिकटी येथील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते शाहू महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले. त्यानंतर सायंकाळी मिरजकर तिकटी येथून शाहू छत्रपती यांच्या हस्ते मिरवणुकीचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी मधुरिमाराजे, दौलत देसाई, राष्टÑवादीचे शहराध्यक्ष आर. के. पोवार, उमेश पोवार, बाबा पार्टे, माजी स्थायी समिती सभापती आदिल फरास, निवासराव साळोखे, जयकुमार शिंदे, किसन कल्याणकर, लाला गायकवाड, श्रीकांत भोसले, राजू जाधव, फिरोजखान उस्ताद, आदी उपस्थित होते.
राजर्षी शाहू महाराज यांचा जीवनपट मांडणारे सजवलेले चित्ररथ मिरवणुकीत सहभागी झाले होते. फुलांनी सजविलेल्या ट्रॉलीत शाहू महाराजयांचा पूर्णाकृती पुतळा ठेवण्यात आला होता. शाहूंच्या वेशातील मुले सहभागी झाली होती. ‘राधानगरी’चे धरण, ‘साठमारी’, मुस्लिम बोर्डिंग’, भवानी मंडप’, ‘रंकाळा तलाव’, ‘खासबाग मैदान’सह जिल्ह्यातील शाहूकालीन वास्तूंच्या प्रतिकृती उभारल्या होत्या.
‘आरक्षणाचे जनक’, ‘जातिभेदाला मूठमाती देणारे दृष्टे राजे’असे फलकही मिरवणुकीत दिसत होते. घोडे, बैलगाड्यांवर सजलेले चित्ररथ आणि त्यांच्यासमोर धनगर ढोल व विविध पारंपरिक वाद्यांच्या गजरात मिरजकर तिकटी येथून मिरवणुकीस प्रारंभ झाला. मुलींचे लेझीम पथक लक्षवेधी ठरले. बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रोड, पापाची तिकटी, महापालिका चौक, मेढे रस्ता, महाराणा प्रताप चौक, आईसाहेब महाराज पुतळा, बिंदू चौक ते पुन्हा मिरजकर तिकटी असा मिरवणुकीचा मार्ग राहिला. मिरवणुकीच्या मार्गावर विविध ठिकाणी नागरिक जोरदार स्वागत करत सहभागी झाले.मुस्लिम समाजाची लक्षणीय उपस्थितीमिरवणुकीत मुस्लिम समाजातील आबालवृद्ध सहभागी झाले होते. डोक्यावर भगवे व गुलाबी फेटे घालून, मोठ्या उत्साहाने मिरवणुकीत सक्रिय दिसत होते.चालत जाणारे शाहू महाराज थेट ट्रॅक्टरवरकसबा बावड्यातील शाहू हायस्कूलचा विद्यार्थी साहील भांडे हा शाहू महाराजांच्या वेशामध्ये होता. धिप्पाड अशा या शाहू महाराजांचे अनेकांनी फोटो काढले. मात्र, साहील आणि त्यांचे सहकारी चालत निघाले होते. याचवेळी श्रीमंत शाहू महाराज यांच्या छत्रपती शाहू विद्यालयाचा चित्ररथ मागून येत होता. या ट्रॅक्टरवर या शाहू वेशातील साहील भांडे आणि त्याच्या सहकाऱ्यांना उभे करण्यात आले.सहभागी सर्व शाळांना प्रमाणपत्रेया शाहूजयंतीच्या सोहळ्यामध्ये ज्या शाळा सहभागी झाल्या आहेत, अशा सर्व शाळांना माध्यमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्या हस्ते सहभागी प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली.अभिवादनासाठी दसरा चौकात दिवसभर गर्दीसकाळी शासकीय कार्यक्रम झाल्यानंतर शाहू महाराजांना अभिवादन करण्यासाठी दसरा चौकामध्ये दिवसभर गर्दी होती. अनेक संस्था, तरुण मंडळे, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी अभिवादनासाठी रात्रीपर्यंत येत होते.
जिल्हा परिषदेमध्ये शाहू महाराजांना अभिवादनकोल्हापूर : जिल्हा परिषदेमध्ये राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे अध्यक्षा शौमिका महाडिक यांच्या हस्ते पूजन झाले. यावेळी उपाध्यक्ष सर्जेराव पाटील, सभापती विशांत महापुरे, वंदना मगदूम, गटनेते अरुण इंगवले, पक्षप्रतोद विजय भोजे, प्रकल्प संचालक अजय माने, विभागप्रमुख रविकांत आडसूळ, संजय राजमाने, प्रियदर्शिनी मोरे, चंद्रकांत सूर्यवंशी, आशा उबाळे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.
सत्यशोधक हॉटेलचा देखावा ठरला लक्षवेधीकोल्हापूर : येथील लोकराजा छत्रपती शाहू प्रतिष्ठानच्या उभा मारुती चौकातून निघालेल्या शाहू जयंती मिरवणुकीमध्ये गंगाराम कांबळे यांच्या सत्यशोधक हॉटेलच्या देखाव्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. विशेष म्हणजे कांबळे यांचे नातू प्रफुल्ल हे या देखाव्यात सहभागी झाले होते. प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाबा महाडिक यांनी उपस्थितांचे स्वागत केले. यावेळी उभा मारुती चौकात उभारलेल्या व्यासपीठावर रामदास पाटील आणि मानसिंग पाटील या दोघांचा शाहू पुरस्काराने गौरव करण्यात आला. यानंतर देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांच्या हस्ते मिरवणुकीचा प्रारंभ झाला. स्वराज्य ढोलपथक, घोडेस्वार, अनेक कार्यकर्त्यांनी यावेळी भगवे फेटे बांधले होते, तर महिला भगव्या साड्या नेसून आल्या होत्या. यावेळी नागोजी पाटील, हिंदुराव हुजरे-पाटील, संभाजी थोरात, राजू सावंत, मदन पाटील, संजय शेटे, डॉ. संदीप पाटील, बाबा इंदूलकर, उज्ज्वल नागेशकर, आदिल फरास यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.