कोल्हापूर : शालेय विद्यार्थ्यांच्या उपस्थितीतील अनोख्या सत्काराने हसूर सासगिरी (ता. गडहिंग्लज) येथील पहिल्या महिला नाभिक शांताबाई यादव या रविवारी भारावून गेल्या. जागतिक महिला दिनानिमित्त शिवाजी मराठा हायस्कूलच्या वतीने आयोजित कार्यक्रमात त्यांचा सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमाच्या प्रारंभी अजय कुरणे यांनी दिग्दर्शित केलेला ‘बलुतं’ हा शांताबाई यांचा जीवनप्रवास उलगडणारा लघुपट दाखविण्यात आला. त्यानंतर रमा साळवणकर यांच्या हस्ते शांताबाई यांना साडीचोळी आणि गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. चित्रकार प्रशांत जाधव यांनी शांताबाई यांना साडी भेट दिली. मातापालक कविता कांबळे, चिल्लर पार्टीच्या सविता यादव यांचा सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक प्रवीणकुमार काटकर, तर डॉ. सुषमा शितोळे प्रमुख उपस्थित होत्या.
स्त्री-पुरुषांमधील विषमत्तेची रेषा ५० वर्षांपूर्वी शांताबाई यांनी पुसून टाकली. त्यांनी विविध अडचणींवर मात केली. आपल्यातील वेगळी स्त्री त्यांनी बाहेर काढली. त्यांना समाजाने पाठबळ दिले. मुली, महिलांनी त्यांचा आदर्श घ्यावा. कोणत्याही क्षेत्रात काम करा; पण आपले वेगळेपण सिद्ध करा. सौंदर्याने नव्हे, तर कर्तृत्वाने मोठे व्हा, असे आवाहन डॉ. शितोळे यांनी केले.
शाळेतील विविध स्पर्धांचा बक्षीस वितरण प्रमुख उपस्थितांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सविता प्रभावळे, अवधूत जाधव, मिलिंद यादव, संजय गुरव, अभय बकरे, आदी उपस्थित होते. अर्पिता गाडेकर हिने सूत्रसंचालन केले. करिना गळवे यांनी आभार मानले. या कार्यक्रमाचे संयोजन विद्यार्थिनींनी केले.
कष्टाचा घास खाऊन समाधानीसासर-माहेराबरोबरच माझ्या गावाने मला जगण्याची कला आणि आधार दिला. अनेक संकटे आली, तरी त्यांना मी जिद्द आणि प्रामाणिकपणे सामोरी गेले. कष्टाचा घास पोटभर मिळतो. तो खाऊन मी समाधानी असल्याचे शांताबाई यादव यांनी सांगितले.