अमर पाटील :
कळंबा : रंकाळा उद्यान परिसरात अगदी सजीवांप्रमाणे दिसणारे व भासणारे परंतु प्रत्यक्षात रबरी हत्ती, पाणगेंडा, दोन मगरी, गवा यांच्या प्रतिकृती उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून वैशिष्ट्य म्हणजे हुबेहूब सजीवांप्रमाणे हे परिसरात मुक्त संचार करणार आहेत. कोल्हापूरच्या ग्रामीण संस्कृतीचे दर्शन घडविणारे जात्यावर दळणारी स्त्री, दूधकट्टा आदी प्रतिकृती उभारण्यात आल्या आहेत. तर ‘माय कोल्हापूर’, ‘आय लव्ह कोल्हापूर’ अशा अक्षरांच्या भव्य प्रतिकृती उभारण्यात आल्या आहेत. एकवीस फुटी गणेश विसर्जन होणाऱ्या इराणी खाणीत उभारण्यात आलेला चाळीस फूट उंच पाणी उडणाऱ्या विद्युत रोषणाईत रंग बदलणाऱ्या आकर्षक फ्लोटिंग फाउंटन रस्त्यावरून येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांना सुखद धक्का देत आहे. इराणी खाणीलगतच्या पक्षी निरीक्षण केंद्रासभोवताली पक्षी आकर्षित करणाऱ्या विविध चार हजार वृक्षांची लागवड करून संवर्धन करण्यात आल्याने पदपथावर सकाळी व सायंकाळी फिरावयास जाणाऱ्या नागरिकांना निसर्गाच्या सानिध्यात वावरल्याचा भास होत आहे. येथे उभारण्यात आलेल्या बटरफ्लाय गार्डन आणि बोटॉनिकल गार्डन मंत्रमुग्ध करतात.
रंकाळा तलाव प्रभागाचे माजी नगरसेवक यांनी रंकाळा तलाव परिसराचे रूप बदलण्यासाठी दोन कोटींचा विकासनिधी उपलब्ध करून त्यासाठी विशेष प्रयत्न केले. त्यामुळे आज नागरिकांसह पर्यटकांतून समाधान व्यक्त होत आहे.
इराणी खाणीलगत असणाऱ्या धोकादायक सात खाणींभोवती लोखंडी संरक्षक कठडे उभारण्यात आले असून पदपथ विकसित करण्यात आला आहे. एकेकाळी आत्महत्या आणि अपघात यासाठी कुप्रसिद्ध असणाऱ्या या सात खाणींचे रुपडे पूर्णपणे बदलून हा परिसर निसर्गरम्य परिसर बनल्याने आता पर्यटकांना भुरळ घालत आहे हे विशेष. रंकाळा उद्यानात विरंगुळा केंद्र, लहान मुलांना विविध प्रकारची खेळणी उभारण्यात आल्याने परिसरात सायंकाळी तोबा गर्दी उसळलेली पहावयास मिळते . परिसरातील सर्व रस्ते पेव्हर पद्धतीने विकसित करण्यात आल्याने निसर्गरम्य परिसरात दिवसभर व्यावसायिक फोटोग्राफर तरुणांचे फोटो काढताना दिसून येतात
एकंदरीत कधीकाळी प्रेमीयुगुलांच्या अश्लील चाळे, मद्यपींचा अड्डा असणाऱ्या रंकाळा उद्यान परिसराचे बदललेले देखणे रूप पर्यटकांसह परिसरातील नागरिकांना भुरळ घालत आहे
प्रतिक्रिया
माजी नगरसेवक शारंगधर देशमुख
- रंकाळा तलाव कोल्हापूरच्या शिरपेचातील मानाचा तुरा असल्याने रंकाळा तलावास गतवैभव प्राप्त व्हावे, येथे लुप्त होत चाललेल्या ग्रामीण संस्कृतीची अनुभूती मिळावी, निसर्गाच्या कुशीत मनःशांतीसह विरंगुळा प्राप्त व्हावा यासाठी प्रयत्न केले. भविष्यात निधी उपलब्ध करून रंकाळा तलाव आदर्शवत बनविणार.
फोटो मेल केले आहेत
फोटो ओळ
रंकाळा तलावावर ग्रामीण संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या प्रतिकृती उभारण्यात आल्या आहेत. याशिवाय आय लव्ह कोल्हापूर अक्षरांच्या भव्य प्रतिकृती तरुणाईला आकर्षित करीत आहेत.