कोल्हापूर : नव्या पिढीला घडविण्यात डी. वाय. पाटील विद्यापीठाचे योगदान शिक्षणक्षेत्रातील विविध घटकांसाठी प्रेरणादायी ठरणारे आहे. या विद्यापीठाचा सामाजिक, शैक्षणिक वारसा जोपासत विद्यार्थ्यांनी समाजात आदर्शवत काम करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी बुधवारी येथे केले. डी. वाय. पाटील एज्युकेशन सोसायटीच्या (अभिमत विद्यापीठ) १६ व्या स्थापना दिवसाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. त्यांच्या हस्ते ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. जे. एफ. पाटील यांना ‘डॉ. डी. वाय. पाटील जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. एक लाख रुपये, मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप होते.
येथील सयाजी हॉटेलमधील या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील होते. विद्यापीठातील प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी अशा ३७ जणांना प्रमुख उपस्थितांच्या हस्ते विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले. सध्या शिक्षणाचा आयाम बदलला आहे. विद्यार्थ्यांनी आंतरविद्याशाखीय ज्ञान घेऊन समाजासाठी काम करावे. शिक्षणाबरोबरच मानवी मूल्ये, तत्वांचा अंगीकार करून आयुष्यात वाटचाल करावी. गांभीर्यपूर्वक विचार, नावीन्य, एकमेकांना सहकार्य या त्रिसूत्रीनुसार कार्यरत रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी रेखावार यांनी केले. डॉ. डी. वाय. पाटील दादांचे पाठबळ, बंधू सतेज पाटील आणि कुटुंबीयांची साथ आणि कर्मचाऱ्यांच्या ताकदीवर मेडिकल कॉलेज ते अभिमत विद्यापीठापर्यंत आम्ही भरारी घेतली आहे. गेल्या वीस वर्षांपासून वैद्यकीय शिक्षणासह गरजू रुग्णांना आरोग्य सुविधा पुरविण्यात डी. वाय. पाटील ग्रुप योगदान देत असून ते यापुढे कायम राहील, असे कुलपती डॉ. पाटील यांनी सांगितले. शिक्षणक्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या डॉ. डी. वाय. पाटील दादा आणि विद्यापीठाच्या नावाने मला जीवनगौरव पुरस्कार मिळाल्याचा मनस्वी आनंद होत आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षण, दर्जेदार समाजपयोगी संशोधनाच्या जोरावर १६ वर्षांत या विद्यापीठाने जगाच्या शैक्षणिक नकाशावर आपला ठसा उमटविला आहे. विविध अधिकार मंडळाचा सदस्य म्हणून विद्यापीठात योगदान दिल्याचे समाधान आहे, ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. पाटील यांनी सांगितले. या कार्यक्रमात कुलगुरू डॉ. राकेश कुमार मुदगल यांनी विद्यापीठाच्या वाटचालीचा आढावा मांडला. प्र-कुलगुरू डॉ. शिम्पा शर्मा यांनी प्रास्ताविक केले. ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. पाटील यांच्या ‘इस्से इन इकोनॉमिक्स पर्शियन’, ‘अर्थाभिव्यक्ती’ या पुस्तकांचे प्रकाशन झाले. या कार्यक्रमास आमदार जयंत आसगावकर, विद्यापीठाचे विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कुलगुरू के. प्रथापन, कुलसचिव डॉ. विश्वनाथ भोसले, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता, अधिष्ठाता राकेशकुमार शर्मा, कमल पाटील, मेघराज काकडे, धैर्यशील पाटील, प्रतापसिंह देसाई, आर. डी. सावंत, रणजित धुमाळ, संजय जाधव, डी. जी. कणसे, रवि शिराळकर, प्रताप माने, अमित कुलकर्णी, आदी उपस्थित होते. डॉ. सुरूची पवार, अर्पिता तिवारी-पांडे यांनी सूत्रसंचालन केले.