यड्राव : दहावीत चांगले गुण मिळाल्याने अनाथ इंद्रजितला शरद इन्स्टिट्यूटने डिप्लोमा मोफत करण्याची संधी दिली. या संधीचे त्याने शैक्षणिक गुणवत्तेबरोबर इतर क्षेत्रांत आपल्या कतृत्वाची चमक दाखवित त्याची निवड सार्थ केली आणि पुन्हा डिग्री मोफत करण्याची संधी मिळाली. शरद इंन्स्टिट्यूटच्या दातृत्वाने नाकेरीची आश्वासकता मिळाल्याने अनाथ इंद्रजित पाटीलचे उज्ज्वल भवितव्य बहरत आहे.आई-वडिलांचे छत्र नसल्याने नवचैतन्य अनाथालयाच्या आधाराने इंद्रजित वसंत पाटील याने २०१२ साली दहावीमध्ये ८३.८२ टक्के गुण मिळविले; परंतु आर्थिक पाठबळ नसल्याने पुढील भवितव्य अंधकार मय होते. त्याच वेळी ‘अनाथ इंद्रजितची अभियंता बनण्याच्या जिद्दीस हवे पाठबळ’ या मथळ्याखाली ‘लोकमत’ मधून २३ जून २०१२ रोजी वृत्त प्रसिद्ध झाले. त्यास शरद इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष राजेंद्र पाटील-यड्रावकर व एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर अनिल बागणे यांनी अनाथ इंद्रजितचा शरद इन्स्टिट्यूट नाथ बनला. डिप्लोमाची जबाबदारी संस्थेने घेतली.इंद्रजित पाटीलने डिप्लोमा शिक्षणाची मिळालेल्या संधीचे अत्यंत चांगल्या पद्धतीने सोने करीत, डिप्लोमा कालावधीत शैक्षणिक गुणवत्ता वाढीबरोबरच वक्तृत्व स्पर्धेत १४ पारितोषिके, निबंध स्पर्धेत सहा, अभियांत्रिकी तांत्रिक स्पर्धेत सहभाग व पारितोषिक, राज्यस्तरीय समूहगीत स्पर्धेत द्वितीय क्रमांक यांसह विविध स्पर्धेत आपले कौशल्य सिद्ध केले आहे. आणि डिप्लोमामध्ये ८२ टक्के गुण मिळवून गुणवत्ता सिद्ध केली.डिप्लोमा चांगल्या गुणांनी पूर्ण झाला, अन् उच्च पदवी घेण्याची आस लागली. तशी इच्छा संस्थेकडे व्यक्त केल्याने संस्थेने त्याचे पदवीचे शिक्षण मोफत देऊन नोकरी लावण्याची आश्वासक खात्री दिली. त्याचे पालकत्व स्वीकारल्याचे पत्र अनिल बागणे यांनी महाविद्यालयात कार्यक्रम घेऊन नवचैतन्य अनाथालयाचे संस्थापक भीमराव आव्हाड, इंद्रजित पाटील यांना दिले. याप्रसंगी गुरुनाथ राऊत, संतोष घोटगे, अरुण गायकवाड यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. (वार्ताहर)समाजातील उपेक्षित, गरीब, होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी शरद इन्स्टिट्यूटची स्थापना झाली आहे. इंद्रजितने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत दहावीपर्यंत शिक्षण घेतले आहे. त्याला अभियांत्रिकी पदवीकेचे शिक्षण संस्थने दिले आहे. आता त्याची अभियांत्रिकीमध्ये उच्च शिक्षणाचीच नव्हे, तर त्याला नोकरी लावून स्वत:च्या पायावर उभे राहण्यापर्यंतची जबाबदारी आम्ही उचलित आहोत.- अनिल बागणे, कार्यकारी संचालक
‘शरद’ ने स्वीकारले अनाथ इंद्रजितचे पालकत्व
By admin | Published: October 06, 2015 10:08 PM