Kolhapur: चंदगड विधानसभेसाठी बाभूळकर आघाडीवर; काँग्रेस अस्वस्थ
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2024 01:47 PM2024-09-25T13:47:32+5:302024-09-25T13:49:58+5:30
चंदगडचे राजकारण तापले : इच्छुकांनी घेतली सतेज पाटील यांची भेट
कोल्हापूर : चंदगड विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवारीसाठी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या डॉ. नंदिनी बाभूळकर यांचे नाव निश्चित झाल्याचे संकेत मिळाल्याने काँग्रेसमधील इच्छुकांनी मंगळवारी (दि. २४) दुपारी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांची भेट घेतली आहे. काहीही करा; परंतु हा मतदारसंघ कॉंग्रेसकडे घ्या, असा आग्रह या सर्वांनी धरला.
चंदगड विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे आमदार राजेश पाटील यांच्याविरोधात निवडणूक लढवण्यासाठी महाविकास आघाडीतून डॉ. बाभूळकर, अप्पी पाटील, गोपाळराव पाटील, सुनील शिंत्रे, विद्याधर गुरबे, अमर चव्हाण असे अनेकजण इच्छुक आहेत. यातील अनेकांनी पहिल्यांदा सतेज पाटील यांना भेटताना बाभूळकर यांना वगळून भेट घेतली होती. परंतु ज्या पक्षाचा आमदार त्या मतदारसंघातून याआधी निवडून आला आहे, त्यांना ती जागा असे सूत्र महाविकास आघाडीमध्ये ठरल्यामुळे हा मतदारसंघ शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडे जाणार हे नक्कीच आहे.
हीच चर्चा सर्वत्र पसरल्याने कॉंग्रेसमधील इच्छुक गोपाळराव पाटील, अप्पी पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांनी पाटील यांची मंगळवारी भेट घेतली. यावेळी सतेज पाटील यांनी थोडी वाट पाहण्याचा सल्ला दिला. राज्य पातळीवर काही गोष्टी ठरत आहेत. त्यात काय होते पाहू असे त्यांनी सांगितले. यावेळी विद्याधर गुरबे, विलास पाटील, सोमगोंडा आरबोळे, प्रशांत देसाई यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
जयंत पाटील यांची भूमिका महत्त्वाची
राष्ट्रवादी एकसंध असल्यापासून संध्यादेवी कुपेकर आणि डाॅ. नंदिनी यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी चांगले संबंध आहेत. लोकसभेवेळी डॉ. बाभूळकर यांनी सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी बारामतीमध्ये मुक्काम ठोकला होता. त्या उच्चशिक्षित आहेत. या सर्व गोष्टींचा विचार करून शरद पवार गटाची उमेदवारी त्यांना मिळेल, अशी चर्चा त्यांच्याच पक्षात सुरू झाली आहे.
फलक चर्चेत..
दिवंगत नेते बाबा कुपेकर यांचा बारावा स्मृतिदिन गुरुवारी (दि. २६) होत आहे. त्यानिमित्त ज्येष्ठ नेते शरद पवार, बाबा कुपेकर आणि नंदाताई यांचे ठळक छायाचित्र असलेले फलक गडहिंग्लजपासून चंदगडपर्यंत व मतदारसंघात सगळीकडे झळकले आहेत. एवढ्या वर्षात प्रथमच असे स्मृतिदिनाचे फलक झळकले आहेत.