यड्राव : अभियांत्रिकी महाविद्यालये समाजासाठी खूप काही करू शकतात. आत्मनिर्भर भारत बनण्यासाठी ग्रामीण भागात फार मोठी संधी आहे. त्यादृष्टीने लागणारे ज्ञान व विज्ञानाचे कौशल्य शरद इन्स्टिट्यूटमधील इनोव्हेशन, प्रॉडक्शन सेंटर, स्टार्टअप सेंटरमधून विद्यार्थ्यांना मिळते. त्यामुळे शरद इन्स्टिट्यूट हे राज्यातील विद्यार्थी, महाविद्यालय व समाजाला आत्मनिर्भरतेसाठी मार्गदर्शक ठरणारे महाविद्यालय बनत आहे. आमचे विद्यापीठही त्यादृष्टीने वाटचाल करीत आहे. आत्मनिर्भर भारतासाठी आपण सर्वजण प्रयत्नशील राहू, असा आशावाद डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्ही. आर. शास्त्री यांनी केले.
यड्राव (ता. शिरोळ) येथील शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या भेटीप्रसंगी ते बोलत होते. संस्थेचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर अनिल बागणे प्रमुख उपस्थित होते.
डॉ. शास्त्री म्हणाले, आपले विद्यापीठ यशस्वीपणे ऑनलाईन परीक्षा घेण्यात राज्यात पहिले ठरले आहे. त्याचबरोबर शिक्षण मंत्रालयाकडून विविध उपक्रमांसाठी फोरस्टारचे मानांकन मिळाले आहे. शरद इन्स्टिट्यूटही लवकरच स्वायत्त होईल. एकूणच महाविद्यालयाची वाटचाल पाहता नवनवीन तंत्रज्ञानाच्या सुविधा विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देऊन त्यांना स्वयंपूर्ण बनविण्याचा उद्देश कौतुकास्पद असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. डॉ. शास्त्री यांनी परीक्षा विभाग, इनोव्हेशन सेंटर, स्टार्टअप सेंटर या विभागांना भेटी देऊन माहिती घेतली. त्यानंतर डिन, विभाग प्रमुख व प्राध्यापकांशी संवाद साधला.
यावेळी अनिल बागणे यांनी डॉ. शास्त्री यांचा सन्मान केला. स्वागत प्राचार्य डॉ. एस. ए. खोत यांनी केले. उपप्राचार्या प्रा. एस. पी. कुर्लेकर यांनी आभार मानले.
फोटो - ०९१२२०२०-जेएवाय-०२
फोटो ओळ - यड्राव (ता. शिरोळ) येथे शरद इन्स्टिट्यूटमध्ये कुलगुरू डॉ. व्ही. आर. शास्त्री यांचे स्वागत एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर अनिल बागणे यांनी केले.