डॉ. वसंत भोसलेकोल्हापूर : महाराष्ट्र पातळीवर दोन शिवसेना आणि दोन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, तर राष्ट्रीय पातळीवर काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष आता राज्याचे राजकारण ढवळून काढणार असले तरी ज्येष्ठ नेते शरद पवार यातून तेल लावलेल्या पहिलवानासारखे पकडीतून सुटले आहेत. सर्वांपेक्षा अनुभवाने आणि वयाने मोठे असलेले हे पहिलवान सर्वांत आधी सोमवारी गुरुवर्यांचे स्मरण करून मैदानात उतरले!महाराष्ट्रात एका पक्षाला बहुमत मिळण्याचे दिवस १९९० मध्ये मावळले. त्यानंतरच्या प्रत्येक निवडणुकीत आघाडी किंवा युतीची लढाई होत राहिली. काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेना या चार राजकीय पक्षांच्या भोवती गेली तीस वर्षे महाराष्ट्राचे राजकारण घाेंगावते आहे. त्यात २०१४ च्या विधान सभा निवडणुकांनंतर उलथापालथ झाली. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आघाडी संपुष्टात आली. भाजप आणि शिवसेनेची युतीही विस्कटली. चारही पक्षांनी स्वतंत्र निवडणूक लढविल्यांतर भाजप प्रथमच महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वांत मोठा पक्ष म्हणून उदयाला आला. विद्यमान सभागृहातदेखील भाजप सर्वांत मोठा राजकीय पक्ष आहे.मोठ्या पक्षानेच शिवसेनेमध्ये फूट पाडली आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार पाडण्यात आले. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेशी युती करून सरकार स्थापन करण्यात आले. त्याला ज्या दिवशी एक वर्ष पूर्ण झाले. त्याच्या दुसऱ्याच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस या दुसऱ्या राजकीय पक्षात भाजपने फूट पाडली. आता खरी राष्ट्रवादी काँग्रेस कोणती यावरून अजितदादा आणि सुप्रिया सुळे या बहीण-भावंडांमध्ये जुंपली आहे!..तर भाजपच्या पायावर धोंडाभाजप : केंद्रात सत्तेवर असलेल्या भाजपसाठी येणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत महाराष्ट्र खूप महत्त्वाचा आहे. उत्तर प्रदेशानंतर दुसऱ्या क्रमांकाच्या संख्येने महाराष्ट्रातून खासदार निवडून येतात. सलग दोन्ही निवडणुकीत भाजपने मित्र पक्षाच्या साहाय्याने चाळीसहून अधिक जागा जिंकून केंद्रात बहुमत मिळविले. शिवसेनेत फूट पाडल्याने आणि उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदावरून हटविल्याचे मराठी माणसाला दु:ख झाले. त्यातून उद्धव ठाकरे यांना सहानुभूतीच मिळते आहे.काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेची महाआघाडी एकसंघपणे येणाऱ्या निवडणुकांना सामोरे जाणार याची भीती वाटत असल्याचे काही सर्व्हेतून निष्पन्न झाल्याने भाजपने राष्ट्रवादी फोडण्यासाठी मोर्चा वळविला. केंद्रीय सत्तेचा वापर करून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमागे चौकशीचा ससेमिरा लावून हैराण करून सोडले. परिणामी राष्ट्रवादी काँग्रेस या शरद पवार यांच्या अस्मितेवर उभ्या राहिलेल्या पक्षात फूट पडली. याची सहानुभूती शरद पवार यांना लाभल्यास भाजपने आणखीन एक धाेंडा पायावर मारून घेतला, असे दिसेल.राष्ट्रवादी : केंद्रीय तपास यंत्रणांकडून चौकशा चालू असताना राष्ट्रवादीत राहणे कठीण झालेले नेते भाजपशी युती करण्यास उत्सुक होते. अजित पवार यांनी सत्तेशिवाय राहण्यात जीवन व्यर्थ आहे, असाच सूर लावला होता. शिवाय अनेक सहकारी साखर कारखाने विकत घेण्याचे प्रकरण अंगाशी आले होते. अशाच घोटाळ्यांशी संबंध असणाऱ्यांनी एकी केली आणि ज्याला बाप (शरद पवार) मानले होते त्यालाच विसरून भाजप-शिवसेना युती सरकारमध्ये सामील झाले. आता कायदेशीर लढाई सुरू केली असली तरी शरद पवार यांनी हा खटला जनतेच्या न्यायालयात घेऊन जाण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या सहा महिन्यांत होणाऱ्या मैदानात (निवडणुका) येण्याचे आव्हान दिले आहे.काँग्रेसला गुदगुल्या काँग्रेस : देशव्यापी तरी महाराष्ट्रात अजगरासारखी थंड पडलेली काँग्रेस उरलेसुरले विरोधी पक्षनेतेपदाकडे आशेने पाहत आहे. सर्व विरोधकांच्या आघाडीची आशा मावळणार नाही ना, हा सवाल त्यांना सतावतो आहे आणि अजित पवार यांनीच शरद पवार यांना इंगा दाखविला याच्या गुदगुल्या देखील होत आहेत.उद्धव ठाकरेंची शिवसेना सहानुभूतीच्या लाटेवर होणार स्वारशिवसेना : खट्याळ सासूपासून सुटका होण्यासाठी वाटण्या करण्याची मागणी मान्य न झाल्याने घरातून बाहेर पडून नवा संसार थाटला. त्याच संसारात राष्ट्रवादी (सासू) नांदायला आली आहे. तीच पुन्हा वाटणीला आली आहे. परिणामी अस्वस्थता वाढली आहे. भाजपच्या या प्रस्तावाला मान्यता का दिली, असा सवाल मुख्यमंत्र्यांना त्यांचे सहकारी मंत्रीच करू लागले आहेत. आता डाव कधी मोडणार याची भीती मनात दाटून आली आहे. शिल्लक सेना म्हणून हेटाळणी सहन करीत सहानुभूतीच्या लाटेवर स्वार होण्यास सज्ज असलेले उद्धव ठाकरे सेना-भाजपच्या खट्याळ भानगडीवर तोंडसुख घेत आहेत. त्यांच्याकडे गमावण्यासारखे काही नाही.
महाराष्ट्राचे काय होणार?महाराष्ट्र : सत्तेच्या साठमारीत महाराष्ट्राचे काय होणार आहे, असा प्रश्न उपस्थित करणारा ठाण्याच्या वेड्याच्या रुगणालयात भरती करण्याचा रुग्णच आहे, असे एका सुरात सारे राजकीय पक्ष सांगत असतील. केंद्रातील सत्ताधाऱ्यांना संसदेतील अठ्ठेचाळीस जागांची चिंता लागली आहे आणि देशव्यापी विरोधी आघाडी करण्यात पुढाकार घेऊ पाहणाऱ्या शरद पवार यांना घरचा आहेर द्यायचा होता, हे आता जरी जमले असले तरी ते तेल लावलेला पहिलवान आहेत, असे महाराष्ट्रात त्यांच्याकडे पाहतो आहे का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.