Sharad Pawar News: संकट आल्यावर पळून जाणे, लाचारी स्वीकारणे हा कागलचा इतिहास नाही. ज्यांनी लाचारी स्वीकारली त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या सगळ्यांच्या पाठिंब्यावर समरजितसिंह घाटगेंना विधानसभेवर पाठवा. महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये गेल्यानंतर ते फक्त आमदार राहणार नाहीत तर त्यांना मंत्री करू, असा शब्द शरद पवार यांनी दिला. समरजितसिंह घाटगे यांनी अधिकृतपणे शरद पवारांच्याराष्ट्रवादी काँग्रेस गटात प्रवेश केला. यावेळी गैबी चौकात शरद पवार यांनी उपस्थितांना संबोधित केले.
शरद पवार पुढे म्हणाले की, मोठ्या संख्येने तुम्ही समरजित घाटगे यांच्यासाठी उपस्थित राहिलात. गैबी चौकात अनेकदा सभा घेतल्या, पण आजची गर्दी कधी पाहिली नाही. याचा अर्थ परिवर्तनाचा निर्णय जो समरजित घाटगे यांनी घेतला तो योग्य आहे. स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक आणि स्वर्गीय बाबासाहेब कुपेकर यांनी दिलेली साथ विसरून चालणार नाही. मागे एकदा पक्ष फुटला त्यावेळी सदाशिवराव आणि बाबासाहेब यांनी पाच वर्षात पुन्हा पक्ष उभा करण्यासाठी प्रयत्न केला. कोल्हापूरची भूमी स्वाभिमान गहाण ठेवत नाही हे या सहकाऱ्यांनी दाखवून दिले होते, अशी आठवण शरद पवारांनी सांगितली.
लाचारी स्वीकारली त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही
कागलने कधीही लाचारी स्वीकारली नाही, तसा इथला इतिहास नाही. ज्यांनी लाचारी स्वीकारली त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. या तालुक्यातून एका व्यक्तीला आम्ही सर्वकाही दिले. पण संकट आल्यानंतर साथ सोडून भलत्याच्या मागे गेले. त्यांच्यावर ईडीच्या काही चौकशा सुरू केल्यानंतर ते अस्वस्थ झाले. त्यांच्या कुटुंबीयांतील भगिनींनी ईडीने आम्हाला गोळ्या घालाव्या अशी भूमिका घेतली. पण त्यांचा कुटुंबप्रमुख लाचार होऊन भ्रष्टाचाऱ्यांच्या दारी गेला, अशी बोचरी टीका शरद पवार यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर केली.
दरम्यान, सत्तेसाठी जर कुणी गायब झालं असेल तर त्याला शाहू महाराजांच्या विचाराच्या कोल्हापूरकरांनी धडा शिकवला, कधीही लाचार होणार नाही असा संदेश दिला. तरुणांची कष्ट करण्याची तयारी आहे पण त्यांना उद्ध्वस्त करण्याचं काम मोदी सरकार करत आहे. महिलांवरील अत्याचारात मोठी वाढ झाली असून रोज त्याच्या बातम्या येतात. लोक आता रस्त्यावर उतरत आहेत. पण केंद्र सरकार त्यावर कोणताही निर्णय घेत नाही. ज्या लोकांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या कामात भ्रष्टाचार केला, वाऱ्याच्या वेगाने पुतळा पडला, असे सांगितले अशांच्या हातात महाराष्ट्र द्यायचा नाही याचा निर्णय आपल्याला घ्यावा लागेल, असे आवाहन शरद पवारांनी केले.