कोल्हापूर : सीमाप्रश्नावर सर्वोच्च न्यायालयात पुढील महिन्यात सुनावणी होणार आहे, तत्पूर्वी महाराष्ट्राने ठामपणे भूमिका मांडणे गरजेचे आहे; त्यासाठी येत्या आठवडाभरात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून या महिनाअखेरीस दिल्लीत वकिलांची बैठक घेऊ, असे आश्वासन शरद पवार यांनी दिले.शाहू समाधिस्थळ लोकार्पण सोहळ्यानिमित्ताने कोल्हापुरात आलेल्या शरद पवार यांची ‘मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती’च्या शिष्टमंडळाने भेट घेतली. व्ही. बी. पाटील यांच्या निवासस्थानी झालेल्या या बैठकीत शिष्टमंडळाचे नेतृत्व समितीचे सचिव माजी महापौर मालोजी अष्टेकर आणि खजिनदार प्रकाश मरगळे यांनी केले.अष्टेकर आणि मरगळे यांनी सीमाप्रश्नावर सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीची तारीख लवकरच लागणार असल्याने याबाबत महाराष्ट्राकडून तयारी करावी लागणार असल्याचे पवार यांच्या निदर्शनास आणून दिले. गेल्या महिन्यात ७ डिसेंबरला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यासंदर्भात बैठक घेतली आहे.
या बैठकीत घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी तातडीने होण्याची गरज असल्याचे निदर्शनास आणून दिले. यावर पवार यांनी यासंदर्भात या आठवडाभरात मुख्यमंत्री ठाकरे यांच्याशी चर्चा करून दिल्लीत होणाऱ्या वकिलांच्या बैठकीसंदर्भात नियोजन केले जाईल, असे सांगितले.
सीमाप्रश्नावर सध्या सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी अंतिम टप्प्यात आहे. मागील वेळी झालेल्या सुनावणीत महाराष्ट्रातील मागील सरकारकडून कागदपत्रे सादर करण्यात दिरंगाई झाली होती. यावरून बरीच चर्चाही रंगली होती. त्यानंतर मात्र आता आलेल्या नव्या सरकारने सुरुवातीपासून आक्रमक आणि तितकीच सावध भूमिका घेतली आहे.
दावा सांगताना कोणत्याही त्रुटी राहू नयेत, याची खबरदारी घेतली जात असून, वकिलांची फौजच उभी केली आहे. या वकिलामार्फत कर्नाटक सरकारविरोधात भक्कमपणे पुरावे देण्याची तयारी झाली आहे. या महिनाअखेरीस दिल्लीत यावर बैठक होऊन त्यांना पुढील सूचना दिल्या जाणार आहेत.या शिष्टमंडळात कृषी बाजार समिती संचालक महेश चुयेकर, कुस्तीगीर समितीचे प्रकाश पाटील, सुनील आनंदाजे, ग्रामपंचायत अध्यक्ष महादेव मगनरकर यांचा समावेश होता.