कोल्हापूर / कागल : कागल तालुक्यातील एका व्यक्तीला आम्ही सर्वांनीच प्रोत्साहित केले. सत्ता दिली, सगळं काही दिलं, परंतू संकटाच्या काळात साथ द्यायची सोडून ते आम्हाला सोडून गेले. त्यांच्या घरातील भगिनी आम्हाला त्रास देण्यापेक्षा गोळ्या घाला म्हणत होत्या, परंतु ज्यांनी त्यांना हा त्रास दिला त्यांच्याच दारात ते लाचारासारखे गेले, परंतु कागलची जनता या लाचारांना धडा शिकवेल असा खणखणीत इशारा जेष्ठ नेते शरद पवार यांनी दिला.भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष आणि शाहू समूहाचे नेते समरजित घाटगे यांनी पवार यांच्या उपस्थितीत शरद पवार गटात प्रवेश केला. मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घराशेजारीच असलेल्या गैबी चौकामध्ये ही प्रचंड गर्दीची सभा झाली. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, सुहासिनीदेवी घाटगे, उत्तम जानकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील, आर. के. पोवार, नवोदिता घाटगे, डॉ. नंदिनी बाभूळकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. सर्वच वक्त्यांनी मुश्रीफ यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली.शरद पवार म्हणाले, शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या कामात भ्रष्टाचार करणारे, महिलांवरील अत्याचार रोखू न शकणारे, युवकांना कामाचा अधिकार न देणारे आणि शेतकऱ्यांना न्याय न देणारे महाराष्ट्रातील हे सरकार बदलल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. मी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहतोय. मला देशाची आणि राज्याची चिंता आहे. कष्ट करणारा, काळ्या आईशी इमान राखणाऱ्या शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेण्याचे अधिकार आणि जबाबदारी असताना केंद्र आणि राज्य सरकारला फारसे स्वारस्य नाही.प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, सरकारच्या कारभाराला कंटाळलेला महाराष्ट्र निवडणुकांची वाट पाहतोय. जनतेला लोकसभेची पुनरावृत्ती करायची आहे. पवार हे वस्तादांचे वस्ताद आहेत. ते एक डाव नेहमी राखून ठेवत असतात. जे आमच्यातून गेले. त्यांना मी सांगत होतो की, बाकी काही करा पण पवार यांना अंगावर घेऊ नका. संरक्षण मिळतंय म्हणून तुम्ही जरी तिकडं गेला असला तरी कायदा कायद्याचं काम करणार आहे.धनगर समाजाचे नेते उत्तम जानकर म्हणाले, कोल्हापूर आणि कागल ही परिवर्तनाची भूमी आहे. अन्याय आणि अत्याचाराचे थैमान सुरू असताना जंगल पेटवून जाळे लावल्यानंतर अनेकजण त्यात अडकले. यावेळी जानकर यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांचे नाव न घेता शेलक्या भाषेत समाचार घेतला.
प्रचंड जल्लोष, घोषणासमरजित घाटगे यांच्या प्रवेशावेळी कार्यकर्ते प्रचंड उत्साही दिसले. कागलच्या परंपरेप्रमाणे प्रचंड घोषणा, वेगवेगळे आवाज, वैविध्यपूर्ण फलक आणि आतषबाजी यामुळे या सभेमध्ये प्रचंड जल्लोष दिसून आला. ‘रामकृष्ण हरी, वाजवा तुतारी’ या घोषणा सातत्याने सुरू होत्या. ‘घाबरलंय घाबरलंय कंप्लिट घाबरलय’ या घोषणेचा जोर तर टीपेला पोहचला होता.