कोल्हापूर - मराठा आरक्षणावरुन आता मराठा नेत्यांमध्ये शाब्दिक युद्ध सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. सत्ताधाऱ्यांकडून करण्यात येणारी विधाने ही आगीत तेल ओतणारी आहेत. सरकारकडे असलेले रेकॉर्डिंग त्यांनी जाहीर करावे, असे म्हणत पवार यांनी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर कोल्हापूर येथूनच निशाणा साधला. केंद्र आणि राज्यात भाजपचे सरकार आहे. त्यामुळे सरकारने तातडीने मराठा समाजाला आरक्षण द्यावे, असेही पवार म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि खासदार शरद पवार यांनी कोल्हापूर येथील कार्यक्रमात महसूलमंत्री चंद्रकांत पाटील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर रेकॉर्डिंगच्या मुद्द्यावरुन शाब्दिक वार केले. मराठा आरक्षणावर भाष्य करताना पवार यांनी फडणवीस सरकारलाही लक्ष्य केले. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने मराठा आरक्षणाचा निर्णय घेतला. पण कोर्टात तो निर्णय रद्द झाला, तोपर्यंत आचारसंहिता लागली. त्यानंतर, भाजपचे सरकार आले. या सरकारनेही धनगर व मराठा समाजाला आरक्षण देण्यात येईल, असे अभिवचन दिले होते. ते आपले वचन पूर्ण करतील असे वाटत होते. पण तरुणांना काहीही न मिळाल्यामुळेच हे आंदोलन पेटल्याचे शरद पवार यांनी म्हटले. तसेच केद्यात व राज्यात भाजपचे सरकार आहे. त्यांनी घटनेत किरकोळ बदल करून आरक्षणाचा निर्णय घ्यावा. याबाबत मी विरोधकाशी बोलेन, त्याला आमच्या पक्षाचाही पाठिंबा असेल, असेही पवार यांनी म्हटले. तर राज्य सरकारच्या नाकर्तेपणाची किंमत जनतेला मोजावी लागू नये, याची खबरदारी अंदोलकांनी घ्यावी असा सल्लाही पवार यांनी आंदोलक तरुणांना दिला आहे.