कोल्हापूर : आमच्यासाठी विधानपरिषद कधीच महत्त्वाची नव्हती, तो जीवन-मरणाचा प्रश्नदेखील नाही. लोकसभा निवडणुकीपूर्वी दिल्लीतील बैठकीत ठरल्याप्रमाणे शरद पवार यांनी सव्वा वर्षांपूर्वी बारामतीत बोलावून घेत विधानपरिषदेची एक जागा देऊ, असे स्वत: सांगितले होते. लोकसभेला केलेल्या मदतीच्या बदल्यात हे राष्ट्रवादी देणे लागत होती, पण आता ती देणे विसरली आहे, अशी टीका स्वाभिमानीचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली. विधानपरिषदेवरील राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या यादीतून नाव वगळल्याच्या पार्श्वभूमीवर विचारलेल्या प्रश्नांवर शेट्टी यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
राजू शेट्टी हे सध्या राज्य सरकारविरोधात पूरग्रस्तांनी काढलेल्या पदयात्रेचे नेतृत्व करत आहेत. राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांसमवेत झालेल्या बैठकीत या आमदारांच्या नियुक्तीबाबत सकारात्मक निर्णय लवकरच होणार आहे. पण या १२ जणांच्या यादीत राष्ट्रवादीच्या कोट्यातून राजू शेट्टीचे नाव कापण्यात आल्याची चर्चा सुरु आहे. या पार्श्वभूमीवर शेट्टी यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, लोकसभा निवडणूकीपुर्वी दिल्लीत शरद पवार यांच्यासमवेत माझी बैठक झाली होती. यावेळी लोकसभेच्या दोन जागांची मागणी केली होती, पण पवार यांनी लोकसभेऐवजी विधानपरिषदेवर घेऊ, असा पर्याय दिला होता. जून २०१९मध्ये बारामतीमध्ये स्वत: पवार यांनी बोलावून घेत विधानपरिषदेसाठी तुमचे नाव राष्ट्रवादीच्या कोट्यातून देत असल्याचे सांगितले आणि ही जागा तुम्ही स्वत: स्वीकारावी, असेही सांगितले. पण त्यानंतर पुढे सव्वा वर्षात यासंदर्भात मी कुणालाही भेटलो नाही, चर्चा केली नाही, भेटलो असेल तर पुढे येऊन सांगावे. विधानपरिषद आमच्यासाठी महत्त्वाची नाही, आमदारकी आमच्या जीवन-मरणाचा प्रश्न कधीच नव्हती. फक्त राष्ट्रवादी देणं लागत होती, ते त्यांनी दिले नाही. सध्या पूरग्रस्तांच्या प्रश्नाशिवाय आमच्यादृष्टीने काहीही महत्त्वाचे नाही.