काेल्हापूर : शाहू छत्रपती यांचा ७ जानेवारीला अमृतमहोत्सवी वाढदिवस साजरा होत असून, यानिमित्ताने त्यांचा सत्कार राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते होत आहे. यावेळी भव्य कुस्त्यांचे आयोजनही संयोजकांनी केले आहे.
शरद पवार व छत्रपती घराणे यांचे जुने ऋणानुबंध आहेत. महाराष्ट्रात एकूणच छत्रपती शिवाजी महाराज व राजर्षी शाहू महाराज यांचे वारस म्हणून छत्रपती घराण्याला खूप आदर आहे. शैक्षणिक, सामाजिक व क्रीडा क्षेत्रांत या घराण्याचे खूप मोठे योगदान आहे. शाहू परंपरेला साजेशी पुरोगामी भूमिका घेत शाहू छत्रपती यांनी महाराष्ट्रभर विविध संस्थांशी वैशिष्ट्य पूर्ण स्नेह जोपासला आहे.
सर्वच राजकीय पक्ष, सामाजिक संघटना आणि समाजामध्ये एक वेगळे स्थान प्राप्त केलेल्या अशा शाहू छत्रपती यांच्या वयाच्या अमृतमहोत्सवी वर्षाला प्रारंभ होत आहे. त्यामुळे येणाऱ्या वर्षभरात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून, त्याची सुरुवात ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थित होत आहे.
७ जानेवारीला सायंकाळी पाच वाजता पवार हे हेलिकॉप्टरने कोल्हापुरात येणार आहेत. सायंकाळी सहा वाजता शाहू खासबाग कुस्ती मैदानाला भेट देणार आहेत. त्यानंतर केशवराव भोसले नाट्यगृहात शाहू छत्रपती यांच्या अमृतमहोत्सवी सत्कार समारंभाला ते उपस्थित राहणार असल्याची माहिती उद्योगपती व्ही. बी. पाटील यांनी दिली.