NCP Sharad Pawar ( Marathi News ) : राष्ट्रवादीतील फुटीनंतर आपल्याला सोडून गेलेल्या आमदारांना त्यांच्याच मतदारसंघात घेरण्यासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे रणनीती आखत आहेत. साथ सोडलेल्या आमदारांच्या मतदारसंघात विधानसभा निवडणुकीसाठी पवार यांनी मोर्चेबांधणी सुरू केली असून अनेक ठिकाणी नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाणार असल्याचं जाहीर केलं आहे. अशातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत गेलेले मंत्री हसन मुश्रीफ यांना आव्हान देण्यासाठी शरद पवार हे सध्या भाजपमध्ये असलेल्या समरजीतसिंह घाटगे यांना पक्षात घेऊन कागल विधानसभा मतदारसंघातून तिकीट देण्यासाठी प्रयत्नशील असल्याची माहिती आहे.
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या काही वरिष्ठ नेत्यांनी कागलमधून उमेदवारीसाठी समरजीतसिंह घाटगे यांना संपर्क केल्याचे समजते. आतापर्यंत घाटगे यांना पवारांच्या राष्ट्रवादीकडून दोन वेळा संपर्क करण्यात आला असून उमेदवारीसाठीही विचारणा करण्यात आली आहे. मात्र घाटगे यांनी अद्याप आपला अंतिम निर्णय कळवला नसल्याने त्यांच्या उमेदवारीबाबत संभ्रम आहे. याबाबत 'एबीपी माझा'ने वृत्त दिलं आहे.
दरम्यान, घाटगे यांच्या उमेदवारीची चर्चा सुरू झाल्यानंतर यावर हसन मुश्रीफ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "माझ्याविरोधात कोण उमेदवार असेल याची मी चिंता करत नाही. मी अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून घड्याळ या चिन्हावर माझा प्रचार सुरू केला आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत मी आमदार होणार मंत्रिमंडळातही सहभागी होणार," असा विश्वास मुश्रीफ यांनी व्यक्त केला आहे.
पवारांच्या राष्ट्रवादीकडून मविआच्या जागावाटपातही आक्रमकता
महाविकास आघाडीच्या जागावाटपात लोकसभा निवडणुकीत ‘कोल्हापूर’ व ‘हातकणंगले’ दोन्ही मतदारसंघ काँग्रेस व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षांना सोडले होते. तेथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे काम केले. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत कोल्हापुरात पाच जागा मिळाल्या पाहिजेत; त्यातही काँग्रेसकडून ‘कोल्हापूर उत्तर’ घ्याच, असा आग्रह पक्षाच्या कोल्हापूरमधील पदाधिकाऱ्यांनी रविवारी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे धरला.
प्रदेशाध्यक्ष पाटील हे रविवारी काही काळ कोल्हापुरात आले होते, त्यावेळी पक्षाचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने विमानतळ येथे त्यांची भेट घेतली. विधानसभा निवडणूक तोंडावर आली आहे. काँग्रेस व उद्धवसेनेच्या वतीने वेगवेगळ्या जागांवर दावा केला जात आहे. पक्षाकडून अद्याप काय करायचे? हे काही सांगण्यात आलेले नाही. त्यामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमावस्था आहे. कोणत्याही परिस्थितीत ‘चंदगड’, ‘कागल’, ‘राधानगरी’, ‘कोल्हापूर उत्तर’ व ‘इचलकरंजी’ या जागा पक्षाकडे घ्या, असा आग्रह जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील यांनी धरला.