Sharad Pawar Shahu Chhatrapati ( Marathi News ) : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज कोल्हापुरातील न्यू पॅलेस इथं शाहू महाराज छत्रपती यांची भेट घेतली. महाविकास आघाडीकडून शाहू महाराजांना कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं जाईल, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात रंगत आहे. या पार्श्वभूमीवर आजची भेट महत्त्वाची मानली जात होती. या भेटीनंतर शरद पवार यांनी लोकसभा उमेदवारीवरून सुरू असलेल्या चर्चांबाबत भाष्य करत शाहू महाराज लोकसभा निवडणुकीत उभे राहिले तर आनंदच होईल, असं म्हटलं आहे.
कोल्हापूर लोकसभेसाठी संभाजीराजे छत्रपती आणि शाहू महाराज छत्रपती यांच्या नावाची चर्चा सुरू असल्याने याबाबतचा प्रश्न पत्रकारांनी शरद पवारांना विचारला. त्यावर पवार यांनी आपल्या खास शैलीत गुगली टाकत म्हटलं की, "अशी चर्चा माझ्या तर कानावर नाही आली. कुठून आली ही चर्चा? मी इतक्या वर्षांपासून इथं येतोय, पण माझ्या कानावर अशी चर्चा नाही. मात्र आता तुम्ही विषयच काढला आहे तर मी याबद्दल बोलतो. शाहू छत्रपतींच्या उमेदवारीबद्दल निर्णय घेण्याचा अधिकार मला एकट्याला नाही. जागांबाबत निर्णय आम्ही चर्चा करून घेतो. मला याबाबत काँग्रेस महाविकास आघाडीच्या घटकपक्षांशी चर्चा करावी लागेल. तसंच माझ्या पक्षातील सहकाऱ्यांशीही चर्चा करावी लागेल," अशी भूमिका पवार यांनी मांडली आहे.
"थोरल्या शाहू राजांच्या विचाराचा वारसा"
शरद पवार यांनी आज शाहू महाराज छत्रपती यांचं तोंडभरून कौतुक केलं आहे. "प्रत्यक्ष राजकारणात शाहू महाराजांचा सहभाग नसतो. सामाजिक कामात ते सहभागी असतात. इथं भेटण्यासाठी आमची जी वेळ ठरली होती, त्याला त्यांच्याकडून थोडा विलंब झाला. त्यामुळे मला आश्चर्य वाटलं. कारण असं कधी होत नाही. मात्र नंतर चौकशी केली असता कळलं की, शाहू महाराज हे व्यंकप्पा भोसले या उपेक्षितांसाठी काम करणाऱ्या व्यक्तीच्या भेटीसाठी गेले होते. याचा अर्थ थोरल्या शाहू राजांचा विचार ते आजही चालवतात. आम्हा लोकांना भेटण्याच्या आधी उपेक्षितांसाठी काम करणाऱ्या व्यक्तीला भेटणं त्यांना महत्त्वाचं वाटलं. हे शाहू-आंबेडकर-फुले यांच्या विचारांशी सुसंगत आहे. त्यामुळे आम्हाला आनंद होईल. ते कधी राजकीय निकाल घेत नाहीत. राजकीय पक्षात ते सहभागी झाले, हे मी तर कधी पाहिलं नाही. मात्र तुम्ही म्हणताय तशी चर्चा असेल आणि कोल्हापूरकरांचीही हीच भावना असेल, तर व्यक्तीश: मला आनंदच होईल," असं मत शरद पवारांनी मांडलं आहे.
दरम्यान, महाराष्ट्रात गेल्या काही काळापासून मोठी राजकीय उलथापालथ सुरू आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन पक्ष फुटल्यानंतर आता राष्ट्रीय पक्ष असलेल्या काँग्रेसमधील नेतेही पक्षांतर करू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीला बळकटी देण्यासाठी मुत्सद्दी शरद पवारांकडून नवनवीन लोकांना राजकीय मैदानात उतरवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं बोललं जात आहे.