कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते शरद पवार हे आज कोल्हापूर दौऱ्यावर येत असून सायंकाळी साडेपाचच्या दरम्यान ते न्यू पॅलेसवर जावून शाहू महाराज यांच्याशी चर्चा करणार आहेत. चहापानासाठी अनौपचारिक भेट असे त्याचे स्वरुप असले तरी त्यामध्ये लोकसभेच्या अनुषंगाने काही चर्चा होण्याची शक्यता आहे.पवार दुपारी ४ वाजता हेलीकॉफ्टरने पुण्याहून निघतील. कोल्हापूर विमानतळावरून ते थेट न्यू पॅलेसवर जातील. तिथे शाहू महाराज यांच्याशी चर्चा आणि चहापान झाल्यानंतर ते पंचशील हॉटेलवर येतील. त्यानंतर ते ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या स्मृतिस्मारकाच्या अनावरण समारंभास उपस्थित राहतील.कोल्हापूर लाेकसभा मतदार संघातून माजी खासदार संभाजीराजे यांनी स्वराज्य पक्षाकडून निवडणूक लढवण्याचे जाहीर केले आहे. त्याचवेळेला शाहू महाराज यांनीही काँग्रेस किंवा शिवसेनेकडून (ठाकरे गट) ही निवडणूक लढवावी अशीही चर्चा सुरु झाली आहे. पवार रात्री काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्या निवासस्थानी स्नेहभोजन घेणार आहेत. तिथे उमेदवारीसंदर्भात काही निर्णायक चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यातील काही स्पष्टता होण्यासाठी शाहू महाराज यांच्याशी ते अगोदर चर्चा करण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने या चहापान आणि स्नेहभोजन भेटीला महत्व आले आहे.पवार यांचा आज मंगळवारी कोल्हापुरात मुक्काम असून उद्या सकाळी ते नऊ वाजता हेलिकॉफ्टरने पुण्याला रवाना होतील. तत्पूर्वी त्यांच्या नेहमीच्या सवयीप्रमाणे सकाळी ७ वाजता पंचशील हॉटेलवर ते पत्रकारांशी संवाद साधण्याची शक्यता आहे.
शरद पवार कोल्हापूर दौऱ्यावर, शाहू महाराजांशी अनौपचारिक भेट; लोकसभेच्या अनुषंगाने चर्चा होणार?
By विश्वास पाटील | Published: February 20, 2024 2:26 PM