भाजपकडून अयोध्येतील प्रभू श्रीरामांचे मंदिर हा प्रतिष्ठेचा आणि भावनेचा मुद्दा बनवण्यात आला होता. आता, मोदी सरकारच्या कार्यकाळात हे मंदिर बनवून पूर्ण होत आहे. अयोध्येतील बहुप्रतीक्षित राम मंदिर पूर्णत्वाची तारीखच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुरुवारी जाहीर केली. पुढच्या वर्षी १ जानेवारीपर्यंत रामलल्लाचे भव्य मंदिर बांधून पूर्ण होईल, असे ते म्हणाले. अमित शहांच्या या घोषणेसंदर्भात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना प्रश्न विचारण्यात आला, त्यावर पवार यांनी गृहमंत्र्यांना टोला लगावला. तसेच, ते पुजाऱ्याची भूमिका घेतातंय, असंही ते म्हणाले.
अमित शहांनी आसाममधील येथील एका कार्यक्रमात लोकांना संबोधित करताना, देशभरात पंतप्रधान मोदींच्या कार्यकाळात झालेल्या विविध धार्मिक स्थळांच्या कॉरिडॉरची माहितीही दिली. तसेच, राम मंदिराचे लोकार्पण कधी होणार, याची तारीखही जाहीर केली. त्यावरुन, आता शरद ववार यांनी त्यांना टोला लगावला आहे.
राम मंदिर हा देशाच्या गृहमंत्र्यांचा हा विषय येतो की नाही. पण, राम मंदिराचे काम पूर्ण कधी होणार, याची घोषणा एखाद्या पुजाऱ्याने करायला हवी होती. परंतु, ती घोषणा देशाच्या गृहमंत्र्यांनी केली. गृहमंत्री पुजाऱ्याचीही जबाबदारी घेतायंत, काही हरकत नाही, असे म्हणत शरद पवार यांनी गृहमंत्री अमित शहा यांना अयोध्येतील राम मंदिरावरुन टोला लगावला. तसेच, सामान्य नागरिकांना भेडसवणाऱ्या समस्यांवरुन लक्ष्य विचलित करण्यासाठीच राम मंदिरासारखे विषय काढले जातात, असा आरोपही पवार यांनी केला.
कडवट शिवसैनिक ठाकरेंसोबत
सत्ता हातात असताना जमिनीवर पाय ठेऊन वागायचे असते. पण अलिकडच्या काळात सत्ता ज्यांच्या हातात त्यांच्याकडून चुकीची भाषा केली जात आहे. हे राजकीय नेत्यांचे खरे काम नाही. शिवसेनेत दोन गट पडले ही गोष्ट खरी आहे. पण जो कडवा शिवसैनिक आहे, जो फिल्डवर काम करतो तो कार्यकर्ता उद्धव ठाकरे यांच्याबरोबर असल्याचे शरद पवार म्हणाले. याला कोल्हापूर देखील अपवाद नाही. काही आमदार खासदार इकडून तिकडे गेले असतील. पण उद्या येणाऱ्या निवडणुकीत जनतेच्या भावना लक्षात येतील असेही शरद पवार म्हणाले.
काय म्हणाले अमित शहा
जाहीर सभेत शहा यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर टीका केली. ‘२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत आपण भाजपचे अध्यक्ष होतो, तर राहुल गांधी काँग्रेसचे अध्यक्ष होते. ते रोज विचारायचे, मंदिर तिथेच बांधणार; पण तारीख सांगत नाहीत... तर नोंद घ्या, १ जानेवारी २०२४ ला तुम्हाला अयोध्येत गगनचुंबी राम मंदिर तयार झालेले दिसेल,’ असे ते म्हणाले.
केवळ राम मंदिरच नाही...
‘केवळ राम मंदिरच नाही, तर एक-दोन वर्षे जाऊ द्या, माँ त्रिपुरा सुंदरीचे मंदिरही इतके भव्य बांधले जाईल की संपूर्ण जग ते बघायला येईल. काशी विश्वनाथ, महाकालचा कॉरिडॉर बनविला. सोमनाथ आणि अंबाजीचे मंदिर सोन्याचे बनविले जात आहे. माँ विंध्यवासीनीचे मंदिर नवीन बांधले जात आहे,’ असेही ते म्हणाले.