कोल्हापूर : कोल्हापूर उत्तरच्या निवडणुकीत ऑनलाईनच्या माध्यमातून मतदारांना पैसे वाटण्याचा प्रयत्न आहे. एक हजार रुपये जरी अशा पद्धतीने वाटले तर त्याची ईडीकडे चौकशीची मागणी करू आणि ईडी निश्चितच त्यांच्यावर कारवाई करेल, असे प्रतिपादन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले. रविवारी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
महाविकास आघाडी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी महात्मा गांधीजींना प्रचारात आणणार, हे महात्मा गांधी घरोघरी पोहोचणार. त्यामुळे जनतेने सावध राहावे. ऑनलाईन व्यवहाराच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात काळा पैसा मतदारांच्या खात्यात जाण्याचा धोका आहे. त्यामुळे मतदारांनी सावध राहावे. हजार रुपयांसाठी शुक्लकाष्ट मागे लावून घेऊ नका. याची इडीकडे चौकशीची मागणी करू, असेही त्यांनी स्पष्ट केले.
चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले, सतेज पाटील आणि महाविकास आघाडीतील काही नेते सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आले. इतके सगळे असूनही सतेज पाटील कॅबिनेट मंत्री होऊ शकले नाहीत. काँग्रेसचे राज्य अध्यक्षही झाले नाहीत. ते महापालिका, जिल्हा परिषदेतच रमले. एका गिरणी कामगाराचा मुलगा इतकी प्रगती करतो हे त्यांना बघवत नाही. म्हणून ते माझ्यावर कोल्हापुरातून पळून गेलो अशी टीका करतात.
आमच्या पक्षात नेत्यांच्या आदेशाला महत्त्व आहे. त्यामुळे मी कोथरूडमधून निवडणूक लढवली. विकासकामांसाठी कधीही बिंदू चौकात यायला तयार आहे. मी धर्मांध नाही, पण धर्माभिमानी आहे ही राज ठाकरे यांची भूमिका सर्वसामान्य हिंदूला आनंद देणारी आहे. राज यांच्या भाषणामुळे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची आठवण झाली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर जातीयवाद वाढला असे विधानही राज यांनी केले होते. त्यांच्याशी मी शंभर टक्के सहमत आहे.
बुडत्या जहाजाचे कॅप्टन पद घेण्यास पवार यांचा नकार
यूपीए आघाडीचे अध्यक्षपद घेण्यास शरद पवार यांनी नकार दिला आहे. यावरही चंद्रकात पाटील यांनी निशाणा साधला. बुडत्या जहाजाचे कॅप्टनपद कोण घेणार? म्हणून यूपीएचे अध्यक्षपद घेण्यास शरद पवार यांनी नकार दिला असल्याचे पाटील म्हणाले.