मुंबई - माजी केंद्रीयमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी चक्क रेल्वेने प्रवास केला. मुंबईत एक महत्वाचे काम असल्याने पवार यांनी तब्बल 29 वर्षांनी 'कोल्हापूर ते मुंबई' असा रेल्वेप्रवास केला. कोल्हापूर दौऱ्यावर असलेल्या पवार यांना पत्रकारांनी याबाबत प्रश्न विचारला होता. यापूर्वी रेल्वेने कधी प्रवास केला? असा प्रश्न पवारांना विचारला, त्यावर 1989 साली महापुराच्या पाहणीसाठी आलो होतो, त्यावेळी आपण रेल्वेने प्रवास केल्याची आठवण पवार यांनी सांगितली. पवारांचा हा रेल्वेप्रवास सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
देशाचे नेते असलेले पवार वाढते वय आणि शारीरिक स्वास्थतेची नेहमीच काळजी घेतात. त्यामुळेच, ते दूरचा प्रवास हा खासगी जेट, हॅलिकॉप्टर आणि जवळचा प्रवास शक्यतो, स्वत:च्या कारने करतात. पवार हे शुक्रवारी 27 जुलै रोजी दिल्लीहून पुण्याला विमानाने, तर रात्री पुण्याहून कोल्हापूरला कारने आले. शनिवारी दिवसभरातील कार्यक्रम आटोपून त्यांना रविवारी सकाळी मुंबईत पोहोचायचे होते. मात्र, खराब हवामानामुळे हेलिकॉप्टर किंवा विमान उड्डाण करू शकणार नाही, याचा अंदाज येताच त्यांनी शनिवारी रात्रीच महालक्ष्मी एक्स्प्रेसने जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे शनिवारी महालक्ष्मी एक्स्प्रेस निघण्यापूर्वी सायंकाळी साडेसात वाजता रेल्वे स्थानकावर प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. तर श्वानपथकही दाखल झाले. रात्री सव्वाआठ वाजता शरद पवार यांची कार रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्मवरुन थेट बोगीजवळ पोहोचली. त्यावेळी शरद पवार व त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार गाडीतून खाली उतरले. रेल्वे स्थानकावर अगोदरच कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. त्यामुळे पवार काही मिनिटांसाठी रेल्वे स्थानकावर थांबले. त्यांच्यासोबत आमदार हसन मुश्रीफ, के.पी. पाटील, ए.वाय.पाटील, आर.के.पोवार हे कार्यकर्ते बोलत थांबले होते. तर रेल्वेतील वरिष्ठ अधिकारीही स्थानकावर उपस्थित होते. पवार यांना बोगीत चढण्यासाठी खास जिनाही लावण्यात आला होता.
शरद पवारांना पाहून रेल्वे स्थानकावर मोठी गर्दी झाली होती. तर यावेळी बोलताना रेल्वे स्थानकावरील स्वच्छतेबाबत शरद पवार यांनी उल्लेख केला. रेल्वे स्थानकावर बरीच सुधारणा झाल्याचेही पवार म्हणाले. तर लोकांची गर्दी वाढत चालल्यामुळे मुश्रीफ यांनी शरद पवार यांना ‘साहेब, गाडीत बसा’ असा सल्ला दिला. त्यावेळी शरद पवार यांनी सर्वांना हात जोडून नमस्कार करीत कोल्हापूरला रेल्वे स्थानकातून बाय-बाय केले.