- विश्वास पाटील कोल्हापूर - ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी माझ्या लोकसभेच्या उमेदवारीसाठी बरेच प्रयत्न केले; परंतू या ना त्या कारणाने ते घडलं नाही, असे शाहू छत्रपती यांनी शुक्रवारी येथे स्पष्ट केले. निमित्त होतं त्यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त छत्रपती शाहू विद्यालयामार्फत शाळेच्या प्रांगणात विद्यार्थी संवाद कार्यक्रमाचे. या मुलाखतीत शाहू महाराज यांनी सर्वच प्रश्र्नांना दिलखुलास उत्तरे दिली.
माजी नगरसेवक नियाज खान यांनी त्यांना राजकारणाविषयी प्रश्र्न विचारला. तुमचे सोनिया गांधी, शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे यांच्याशी चांगले संबंध होते; मग कोणत्या पक्षात जावे असे वाटले नाही का? अशी विचारणा त्यांनी केली. त्यावर शाहू छत्रपती म्हणाले, या तिन्ही नेत्यांशी माझे चांगले संबंध होते व आहेत. सोनिया गांधी यांच्याशी मालोजीराजे यांच्या उमेदवारीवेळी संबंध आला व त्यांनी मालोजीराजे यांना लगेच उमेदवारी दिली. पवार यांच्याशी तर माझे गेल्या ५० वर्षांचे ऋणानुबंध आहेत. त्यांनीही माझ्या लोकसभेच्या उमेदवारीसाठी प्रयत्न केले होते. नंतरच्या काळात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी राजकीय संबंध आले. त्यांनी मला शिवसेनेत प्रवेश करायला सांगितला. त्यांच्या आग्रहाखातर मी प्रवेश केला. परंतू उमेदवारीचं मात्र घडलं नाही.
कुस्ती आणि मल्लखांब यासारखे पारंपरिक खेळ रुजले पाहिजेत, त्यासाठी सरकारने प्रशिक्षण वर्ग आणि स्पर्धांसाठी प्रोत्साहन दिले पाहिजे, अशी अपेक्षा शाहू महाराजांनी एका प्रश्नाला उत्तर देताना व्यक्त केली. शाहू महाराजांनी उद्यमनगर, शाहूपुरी उभारली. भविष्यातही इथे अनेक उद्योगधंदे येतील, त्यांना प्रोत्साहन द्या. यासाठी अनेक परप्रांतीय इथे आले आहेत, त्यांनाही संरक्षण द्या, असे त्यांनी सांगितले. प्रारंभी स्मरणिकेचे प्रकाशन आणि आझाद नायकवडी यांच्या पोवाड्याच्या ध्वनिचित्रफितीचे अनावरण त्यांच्याहस्ते झाले. या कार्यक्रमाला संग्रामसिंह, युवराज संभाजीराजे आणि मालोजीराजे, संयोगिताराजे, मधुरिमाराजे, युवराज शहाजीराजे, यशस्विनी आणि यशराजे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
शेतकऱ्यांविषयी आस्था...शेतकरी आत्मनिर्भर झाला पाहिजे, अनेक योजना सुरू आहेत, पण शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष होत आहे, याची खंत व्यक्त करून त्यांनी, कष्टाचा मोबदला शेतकऱ्यांना मिळालाच पाहिजे, अशी भूमिका मांडली. कोल्हापुरात जो विचार मांडला जातो, तो महाराष्ट्रात, देशात रुजतो, असे सांगून शाहू महाराजांच्या वास्तू, वारसास्थळे जपा, असे आवाहन केले.