कोल्हापूर : सत्ता असताना आपल्याच घरातील आणि बाहेरील लोकांना गृहित धरून, मी करतोय ते बरोबरच असे वागले की काय होते ते शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसबाबत दिसत असून शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना पक्ष शोधावा लागतोय अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.बावनकुळे कोल्हापूर जिल्हयाच्या दौऱ्यावर असून त्यांनी आज, शनिवारी सकाळी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी खासदार धनंजय महाडिक, मुरलीधर मोहोळ, माजी आमदार अमल महाडिक, समरजित घाटगे, विजय जाधव, केशव उपाध्ये उपस्थित होते.जुन्या-नव्या भाजप कार्यकर्ते संघर्षाबाबत विचारले असता बावनकुळे म्हणाले, जेव्हा पक्ष वाढतो तेव्हा काहीजणांना असुरक्षित वाटते. परंतू निवडून येण्याचे ‘मेरिट’ पाहूनच तिकीट दिले जाते. त्यामुळे जनसंघ, भाजपच्या स्थापनेपासूनचे काही जिल्ह्यातील कार्यकर्ते नाराज आहेत. परंतू माझ्यासह अनेक ज्येष्ठ पदाधिकारी त्यांच्याशी चर्चा करत आहेत. त्यांची समजूत आम्ही काढू.देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत, अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत किंवा एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत असे त्या त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना वाटणे गैर नाही. परंतू याचा निर्णय केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड आणि हे तीनही नेते घेतील.
पवार, ठाकरे यांना पक्ष शोधावा लागतोय; चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका
By समीर देशपांडे | Published: October 07, 2023 12:19 PM